Coronavirus : संचारबंदी की 'मुक्त'संचार?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

सर्व व्यवहार नियमित सुरू 

  • किराणा दुकाने, भाजी मंडईंमध्ये सकाळपासूनच गर्दी 
  • पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी 
  • सर्व थरातील नागरिकांचा बिनधास्त वावर
  • आपापल्या भागातील जागृतीची नगरसेवकांनी जबाबदारी घ्यावी 
  • किराणा, भाजी दुकाने, फेरीवाले यांच्यावर वेळेवर बंधन आणावे.

पिंपरी - लॉकडाउन आणि संचारबंदीचा आदेश, असे वातावरण शहरात कुठेही दिसत नाही. भाजी मंडईत प्रचंड गर्दी आहे. किराणा दुकानांसमोर लांबलचक रांगा आहेत. चौकाचौकातील बाकांवर लोक आरामात गप्पा मारत बसलेले आहेत. व्यायामाच्या बहाण्याने सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या लोकांनी रस्ते गच्च भरलेले आहेत. कोठेही सुरक्षित अंतर नाही, मास्क नाहीत. दुकानदारांकडून शिस्त नाही, असे सगळे चिंताजनक वातावरण सर्वत्र आहे. शासकीय सर्व यंत्रणा नागरिकांच्या काळजीसाठी अहोरात्र झटत असताना नागरिक बेफिकीर आहेत, असे चित्र विविध परिसराची पाहणी करताना दिसून आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कासारवाडीत नागरिकांची गर्दी 
कासारवाडी रेल्वे गेटखालील परिसर ते गणेश मंदिरापर्यंत असलेल्या भाजी मंडई आवारात जवळपास दहा ते बारा हातगाड्या आहेत. सर्व परिसरात मिळून तीसहून अधिक हातगाड्या आहेत. दत्तनगर, गारजाई चौक, साई विनायक सोसायटी, केशवनगर व विकासनगर या भागात किराणा सुपर मार्केटची दुकाने एकाच रांगेत असल्याने नागरिक गर्दी करतात. भाजी मंडईजवळील पिंपळाच्या मोठ्या झाडाखालील सावलीत टोळक्‍यांची नेहमीचीच गर्दी असते. सर्वांत जास्त युवा वर्ग रस्त्यावर दिसून येत आहे. कंटाळा आलाय म्हणून बसलोय असे त्यांचे उत्तर आहे. मात्र, सायंकाळी पाचनंतर पोलिस आल्यास पळ काढला जातो. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अर्धवट शटर उघडे ठेवून दुकाने सुरू असतात. यशवंत प्राइड परिसरात फिरते टेंपो उभे असल्याने गर्दी आहे. 

‘मासुळकर’मध्ये भीतीच नाही 
मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी परिसरातील नागरिक घराबाहेर फिरतात. त्यांना ना आजाराचे गांभीर्य, ना पोलिसांची भीती आहे. बहुसंख्य लोक घोळक्‍याने गप्पा मारत असल्याचे दिसते. या परिसरातील व्ही सेक्‍टर, टी सेक्‍टर, डब्ल्यू सेक्‍टर आणि एस सेक्‍टर सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर साधारणपणे सहा किरकोळ भाजी व फळ विक्रेते बसलेले आहेत. तसेच याच मार्गावरील पाच किराणा माल दुकानासमोर खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दररोज नागरिक पोती भरून खरेदी करीत आहेत. यावेळी सुरक्षित अंतरदेखील राखले जात नाही. सायंकाळी मुलांची क्रिकेट मॅच रंगते. तर सकाळी-सायंकाळी ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक, इव्हेनिंग वॉक करतच आहेत. काही तरुण घोळक्‍याने चौकाचौकात गप्पा मारतात. ज्येष्ठ नागरिक मास्कविनाच घराबाहेर फिरत आहेत. 

साईनगरमध्ये नियमांचे उल्लंघन
या परिसरातील अंतर्गत भागात अनेक रहिवासी सकाळी अकराच्या सुमारास चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. ज्येष्ठ नागरिक वाचनालयाच्या खुर्च्यांवर बसलेले असतात. येथील नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालय व बंगल्यासमोरच मोठ्या संख्येने बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. बहुतांशी भाजी विक्रेते, किराणा माल विक्रेते हेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. 

काळेवाडी, रहाटणीत बिनधास्त 
काळेवाडी, रहाटणी परिसरातही अशीच परिस्थिती आहे. कॉलनी व अंतर्गत रस्त्यांवर पुरुष, महिला, तरुण मुले बिनधास्त फिरत आहेत. पोलिस आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत आहेत. मात्र, पोलिसांची ही नाकाबंदी शहरातील प्रमुख महामार्ग, वर्दळीचे चौक व नाक्‍यावरच आहे. त्यामुळे पोलिस अंतर्गत भागात येऊच शकत नाहीत, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे या परिसरातील पोलिसांनी महत्वाच्या चौकाबरोबरच अतर्गत रस्ते, कॉलनी व झोपडपट्टीतील परिसरातही गस्त सुरू करावी. 

चिंचवडगावात विदारक चित्र 
याठिकाणी सर्वांत जास्त विदारक चित्र आहे. लोक पहाटेपासूनच विविध बहाण्याने बाहेर पडतात. सहा मोठी किराणा दुकाने, तीन भाजी दुकाने, आठ हातगाड्यांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. महापालिकेकडून सर्वत्र चौकोण आखून दिलेले आहेत. मात्र, सर्वांकडून उल्लंघन होत आहे. तसेच दुकानदारांनी माल गच्च भरल्याने दुकानात शिरायला जागा नसल्याचे चित्र दिसून आले. भाजीवाल्यांकडून स्वच्छता पाळली जात नाही. पहाटे व रात्री लोक घोळक्‍याने मागील रिकाम्या रस्त्यावर फिरत असतात. तसेच, दुचाकी, चारचाकी वाहनांचा सर्रास वापर होत आहे. एका वाचनालयात अनेकजण निवांत बसतात. या साऱ्या भागातील सर्व जनजीवन नियमित आहे. महिला लहान मुलांसोबत बाजारात येतात. विविध मंडळांचे, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा नगरसेवक यांच्याकडून दक्षतेच्या सूचना किंवा जागृती केली जात नसल्याचे काहींनी सांगितले.

वारंवार सूचना करूनही गर्दीच
नवी सांगवी - पोलिसांनी नागरिकांना वारंवार विनंती केली; प्रसंगी काठीचा प्रसादही दिला. तरीही भाजीपाला व फळे खरेदीसाठी नागरिक सकाळ-संध्याकाळ गर्दी करीत आहेत. चौकाचौकात लावलेल्या भाज्यांच्या स्टॉलवर सुशिक्षित नागरिक सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत आहेत. याशिवाय पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल व डिझेल देण्याचा आदेश असताना, सामान्य नागरिकदेखील गर्दी करीत आहेत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

मोशीत संचारबंदीचे पालन
मोशी गावठाण, पुणे-नाशिक महामार्ग, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, मोशी-आळंदी रस्ता, जाधववाडी लिंकरोड, स्पाईन रस्ता, प्राधिकरणातील सर्व पेठा आदी ठिकाणी नागरिक स्वतःहून संचारबंदीचे पालन करीत आहेत. नागरिकांनी घरात बसणेच पसंत केले. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुपारी तुरळक प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. दरम्यान, बोऱ्हाडेवाडीतील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पहाटे दोन ते सहा या वेळेत बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गर्दीला आळा बसला आहे.

उद्योगनगरितील स्थिती
किराणा दुकाने ‘हाउसफुल’
मंडईमध्ये प्रचंड गर्दी
बेफिकीर नागरिकांचा वावर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: curfew or free communication in pimpri chinchwad