Video : शेतकऱ्यांकडून शहरातील सोसायट्यांमध्ये थेट भाजी, फळे विक्री सुरू

अवधूत कुलकर्णी 
Monday, 20 April 2020

राज्य सरकारच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाच्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संघटनेच्या वतीने शहरातील सोसायट्यांमध्ये थेट भाजी, फळे विक्री सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून ग्राहकांनाही ताजी फळे, भाज्या रास्त भावात मिळू लागली आहे. गेल्या महिन्याभरात 15 सोसायट्यांमधून हा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे.

पिंपरी - राज्य सरकारच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाच्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संघटनेच्या वतीने शहरातील सोसायट्यांमध्ये थेट भाजी, फळे विक्री सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून ग्राहकांनाही ताजी फळे, भाज्या रास्त भावात मिळू लागली आहे. गेल्या महिन्याभरात 15 सोसायट्यांमधून हा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाकडे सध्या पाच ते सात शेतमाल उत्पादकांनी नोंदणी केली आहे. आणखी दहा ते पंधराजणांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. नोंदणी करून घेताना महामंडळाच्या वतीने शेतीमालाच्या दर्जाची खात्री केली जाते. त्यामुळे सोसायट्याही आश्‍वस्त राहत आहेत.

संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव आणि ग्राहकांना ताजा माल मिळण्याकडे लक्ष पुरविण्यात येते. सध्या शिरूर, दौंड परिसरातील शेतकरी या शहरातील सोसायट्यांमध्ये भाजीविक्रीसाठी येत आहेत. 
यासंदर्भात संघटनेचे सदस्य विलास कुटे यांनी सांगितले, 'साधारण महिन्याभरापूर्वी या उपक्रमाला सुरवात झाली.

त्यावेळी चार-पाच सोसायट्यांमध्ये अशा पद्धतीने विक्री करण्यात येत होती. आता सोसायट्यांची संख्या 15 पर्यंत गेली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत विक्री करण्यात येते. साधारण सकाळी साडेअकरा ते रात्री आठपर्यंत भाजी विक्री करण्यात येते. या उपक्रमासाठी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगले सहकार्य केले. तसेच भाजपचे चंद्रकांत नखाते, विशाल कलाटे यांचे चांगले सहकार्य लाभले.'' 

उपक्रमाचे फायदे 
- मध्यस्थाची गरज नाही 
- शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ 
- ग्राहकांना मिळतोय ताजा माल 
- शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणास आळा 
- नागरिकांच्या वेळेत आणि पेट्रोलमध्ये बचत 

शेतकरी उत्पादक संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे आम्हाला सोसायटीच्या आवारातच ताजी फळे, भाज्या रास्त भावात मिळू लागली आहेत. 
- दिलीप चौधरी, अध्यक्ष - लक्ष्मीभक्‍ती सोसायटी, रहाटणीगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: direct vegetable fruit sailing in city society by farmer