पुण्यात ‘डॉक्टर आपल्या दारी’ सेवा ठरली प्रभावी; तब्बल एवढ्या रुग्णांवर उपचार

अक्षता पवार
Thursday, 30 April 2020

या उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे मोफत पुरवली जात आहेत. तसेच व्हॅनमधील डॉक्टर रुग्णांची ताप आणि सर्दी-खोकल्याची तपासणी करतात आणि त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुपालन करण्याविषयी सांगतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव समूळ उच्चाटण होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.
- शांतीलाल मुथा, संस्थापक ,बीजेएस

पुणे - कोरोना बाधित रुग्णांमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. या मुळे फोर्स मोटर्स व भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांनी संपूर्ण राज्यात ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून एक लाख ११  हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक एप्रिलपासून या उपक्रमाची सुरवात  झाली. डॉक्टर,  मदतनीस,  औषधांनी सुसज्ज असलेल्या या व्हॅन्स आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागांमध्ये सेवा पुरवत आहेत. कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास त्यांना प्रशासनाने नियुक्त केलेल्या रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा आणि पीसीएमसी, औरंगाबाद, धुळे, नाशिक, रत्नागिरी, सांगली, सोलापूर सारख्या विविध शहरांमध्ये उपक्रम सुरू आहे. 

फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसान फिरोदिया म्हणाले, “महाराष्ट्र हे कोरोनाकरिता हॉटस्पॉट ठरले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. त्यामुळे मोबाईल डिस्पेनसरीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेला मदतीचा हात म्हणून हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाव्यतिरिक्त आमच्या समूहाने (डॉ. अभय फिरोदिया ग्रुप) कोविड-19 मदत कार्यासाठी 25 कोटींची तजवीज केली आहे. या निधीचा वापर आरोग्य सुविधांसाठी, रक्त संग्रह क्षमता वाढवणे,  मोबाईल क्लिनिक/टेस्टींग क्षमता उपलब्ध करून देणे आणि गरजूंना मोफत अन्न पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor aapalya dari service important in pune