Coronavirus : पिंपरीतील डॉक्टरचे नायडू रुग्णालयात कोरोनाशी दोन हात

आशा साळवी
Monday, 6 April 2020

तरुण वयातच मिळणारा हा अनुभव भविष्यात उपयोगी ठरणारा आहे. या विषाणूला हद्दपार करण्यासाठी कोणीतरी जबाबदारी स्वीकारणे आवश्‍यक असल्याने आम्ही लढत राहणार.
- डॉ. अमर अंकुशराव 

पिंपरी - कोरोनाच्या भयान वातावरणात देव आणि धर्माच्या पलिकडे खरे देवदूत आहेत ते डॉक्टर आणि त्यांचे वैद्यकीय कर्मचारी. आपल्या जगण्याची लढाई आता डॉक्टर लढताहेत. स्वतः जोखीम स्वीकारून हीच डॉक्टर मंडळी कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आम्ही लढत राहू असा विश्वास ते बाळगून आहेत. पिंपरीतील एका युवा डॉक्टर पुण्यात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या नायडू रुग्णालयात कोरोनाशी दोन हात करताहेत. डॉ. अमर अंकुशराव बारा तास या युद्धात आघाडी सांभाळत आहेत.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संत तुकारामनगरातील रहिवासी डॉ. अंकुशराव हे गेल्या १० मार्चपासून नायडू रुग्णालयामध्ये ‘नाईट ड्युटी‘वर आहेत. कोरोनाबाधित आणि संशयितांवर उपचार करताना हा विषाणू स्वत:लाही गाठू शकतो, याची शक्‍यता गृहित धरून ते हे जोखमीचे काम करत आहेत. या रुग्णालयात कोरोना संशयित आणि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सगळेच भयग्रस्त आहेत. अंकुशराव यांना नायडू रूग्णालयात ड्युटी लागल्यावर त्यांच्या पालकांना धडकीच भरली. काहींनी तर ‘तू आता नोकरी सोड,'' असे अनाहूत सल्लेही दिले. मात्र, मी कर्तव्याची निवड केली असून मी तेथे जाईन, असे त्यांनी सर्वांना निक्षून सांगितले. माझ्या कामाची माहिती शेजाऱ्यांना असून त्यांचा पाठिंबा आहे, असेही ते आवर्जून सांगतात.  

अंकुशराव यांची कामाची वेळ रात्री नऊ ते सकाळी नऊ अशी आहे. त्यांच्यासोबत डॉ. लोकेश कृष्णा आणि डॉ. क्षितीज देशमुख आहेत. या बारा तासाच्या ड्युटीत त्यांना बाह्यरुग्ण तपासणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती घेणे, उपचार सुरू असलेल्या कक्षात भेट देऊन तपासणी करणे, निगेटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज आदी कामे करावी लागतात. अनेकदा रात्रीही कोरोनाचे संशयित रुग्ण येतात. त्यावेळी पीपीई किट, मास्क लावून अशी स्वत:ची काळजी घेत रुग्णांवर उपचार करावे लागतात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कामाचा ताण वाढलेला आहे. अनेक संशयित रुग्णांची हिस्ट्री तपासणे, त्यांना बोलवणे आदी कामे करावी लागतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr amar ankushrao war with Corona at Naidu Hospital