मनातला कोरोना :  हवा स्वतःच्या दृष्टिकोनावर आढळ विश्वास 

मनातला कोरोना :  हवा स्वतःच्या दृष्टिकोनावर आढळ विश्वास 

माझ्यासमोर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लिहिली गेलेली दोन आत्मकथनपर पुस्तकं आहेत. एक आहे, द डायरी ऑफ ऍन फ्रॅंक आणि दुसरं आहे, डॉ. व्हिक्‍टर फ्रॅकेल यांचं, मॅन्स्‌ सर्च फॉर मिनिंग. दोन्ही पुस्तकं एकाच कालखंडामध्ये लिहिली गेलेली आहेत, पण दोन्ही लेखकांमध्ये मात्र खूपच अंतर आहे. ऍन फ्रॅंक ही कुमारवयीन मुलगी आहे. युरोपातील नेदरलॅंडमध्ये ती राहते. तिच्या देशावर जर्मनीनं नियंत्रण मिळवलंय. त्यामुळे ती आणि तिचं कुटुंब त्यांच्या घरामध्येच एका ठिकाणी लपून आहेत. ते ठिकाण असं आहे, की झरोक्‍यातून आकाशाचा निळा तुकडा तेवढा दिसतो. या कुटुंबासमवेत राहायला आलेलं दुसरं कुटुंबही आहे. त्यात तिच्याच वयाचा एक मुलगासुद्धा आहे. का बरं ऍनला डायरी लिहाविशी वाटली असेल? अटळ एकटेपणाची परिणती म्हणून की भेडसावणाऱ्या मृत्यूच्या छायेला दूर ठेवायचा एकमेव मार्ग म्हणून की अल्लड किशोरीची व्यक्त होण्याची भूक. या पुस्तकाच्या सुरुवातीला ऍनचं एक छायाचित्र आपल्याला भेटतं (मुद्दाम भेटतं म्हणतोय) अगदी सर्वसामान्य दिसणारी ती मुलगी. पण स्वतःच्या भावनांशी मात्र विलक्षण प्रामाणिक. ती लिहीत जाते आणि तिच्याबरोबरचा आपला प्रवास सुरू होतो. कोणतीही निश्‍चिंती नसलेल्या एका आयुष्याबरोबरचा... ज्या वयात मित्रमैत्रिणींबरोबर खुलेआम हुंदडायचं, आपल्या हौसामौजा पूर्ण करायच्या, त्या काळामध्ये ही मुलगी विजनवासात काही शे दिवस आहे, तरीही स्वतःच्या विचारांकडे आणि भावनांकडे एका साक्षीभावाने पाहत आहे, ज्याच्यासमोर अध्यात्म साधकांनी लोटांगण घालावं. असं काय आहे, या लिखाणात की ज्यामुळे इतकी दशकं लोटली तरी हे पुस्तक अजूनही वाचलं जातंय. या पुस्तकाची शक्ती दोन पैलूंमध्ये आहे. पहिली गोष्ट म्हणजे आरस्पानी जीवनदृष्टी. या सगळ्या संकटांमधून जातानाही ऍनचा जगण्याबद्दलचा दृष्टिकोन हा आशावादी राहिलेला आहे. जरी या दृष्टिकोनाला परिस्थिती वारंवार धक्के देत असली तरीही तिच्या मनातल्या स्त्रीसुलभ भावनाही ती व्यक्त करते. तिच्या लिखाणाची दुसरी शक्ती आहे, स्वतःकडे आणि दुसऱ्यांकडे पूर्वग्रहविरहित दृष्टीनं पाहणं. आपल्या विचारात पूर्वग्रह आले, की आपण वास्तवापासून दूर जायला सुरुवात होते. कसं बरं मिळवलं असेल, इतकं सारं सामर्थ्य या इवल्याशा मुलीनं. परिस्थिती माणसाला शिकवते, हे तर खरंच, पण व्यक्तीच्या आतमध्ये लपलेला ज्ञानियाचा राजा मुळात असेल, तरच त्या परिस्थितीवरचं असं प्रामाणिक भाष्य बाहेर पडेल ना. 

परिस्थितीकडे बघण्याचं स्वातंत्र्य 
डॉ. व्हिक्‍टर फ्रॅकेल हे ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना या राजधानीमध्ये प्रॅक्‍टिस करणारे नामवंत मनोविकारतज्ज्ञ. जन्माने अर्थातच ज्यू. त्यांना खरं तर देशांतर करून अमेरिकेला जाण्याची संधी युद्धाच्या सुरुवातीला उपलब्ध असते, पण आपल्या वृद्ध आई-वडिलांबरोबर राहता यावं, म्हणून व्हिक्‍टर ही संधी नाकारतात. हळूहळू त्यांचा व्यवसाय आणि शहरातील संचारावरही बंधनं येऊ लागतात. आणि एक दिवस त्यांची पाठवणी होते, छळछावणीमध्ये. त्यांच्या हातावरचा क्रमांक दाखवणारा टॅटू, एवढीच काय ती त्यांची व्यक्ती म्हणूनही ओळख. त्यांच्या पत्नीपासून त्यांची ताटातूट होते, तीसुद्धा ती गर्भवती असताना. आईवडील तर पुढे कधी दृष्टीसही पडत नाहीत. छळछावणीमधील जीवन म्हणजे कणाकणानं समोर येणारं मरणच. त्या परिस्थितीचं वर्णन करताना डॉ. फ्रॅकेल लिहितात, ""आमची चैनीची कल्पना काय होती, हे सांगितलं, तर तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. भल्यामोठ्या ओगराळ्याने आमच्या वाडग्यात पडणारं सूप. जर ते ओगराळं भांड्याच्या तळाला पोचलं, तर आमच्या नशिबाला लागतील, बटाट्याचे काही तुकडे आणि वाटाण्याचे काही दाणे. अशा परिस्थितीत या माणसाने आपल्या संशोधनपर लिखाणाचे कागद आपल्या कपड्यांमध्ये शिताफीने लपवलेले असतात. पण एक दिवस हे गुपित फुटतं. नंतर त्यांना नग्न करून त्यांच्यासमोरच त्यांचे कपडे जाळले जातात. आजवरच्या होरपळीतील सगळ्यात दारुण क्षण असतो तो, संपूर्ण मानसिक शरणागतीचा. पण त्याचक्षणी डॉक्‍टरांच्या मनात विचार येतो, आता हे सारं ज्ञान ज्याच्या मेंदूत साठवलेलं आहे, असा जिवंत व्यक्ती मीच. आणि त्यांच्या मनामध्ये वाल्मिकीला जसा रामायणातील पहिला श्‍लोक सुचला तसं एक अक्षर वाक्‍य उमटतं, "ते माझ्यापासून सर्व गोष्टी हिरावून घेऊ शकतात. माझं नाव, माझा पैसा, माझी शान, माझा जीवसुद्धा. पण ते एक गोष्ट माझ्याकडून कधीही हिरावून घेऊ शकत नाहीत. My freedom to look at things, the way I want भोवतालच्या परिस्थितीकडे मी कसं पाहायचं, ते ठरवण्याचं माझं स्वातंत्र्य जगातील कोणतीही शक्ती हिरावून घेऊ शकत नाही.' 

बंधनांबद्दल कांगावा का? 
नेमका हाच तर समान धागा आहे, डॉ. व्हिक्‍टर फ्रॅकेल आणि ऍन फ्रॅक यांच्यामधला. स्वतःच्या दृष्टिकोनावरचा अढळ विश्वास. हा दृष्टिकोन आहे, वास्तववादी प्रयत्नवादाचा. वास्तवाला धरून असलेल्या प्रयत्नवादासाठी आजच्या परिस्थितीमध्ये ही दोन्ही पुस्तकं नव्याने वाचावी, असं वाटतं. आजच्या कोरोनाच्या संकटाला सामोरं जाताना आवश्‍यक अशी वृत्ती या दोन्ही पुस्तकांमधून दिसेल आणि अजूनही एक गोष्ट स्पष्टपणे समोरही येईल. आज आपल्यापैकी अनेकजण जे स्वतःच्या घरामध्ये आहेत, त्यांच्यावर असलेली बंधनं आपल्या दोन्ही नायक-नायिकांच्या तुलनेत नगण्यच म्हटली पाहिजेत. असं असतानाही आपल्यापैकी काहींना बंधनांबद्दलचा कांगावा करण्याची सुरसुरी का बरं येत असावी? आपल्यापैकी जे आपापल्या घरामध्ये सुरक्षित आहत, त्यांच्या फक्त डोक्‍यावर छप्पर आहे, एवढंच नाही, तर नळाला पाणी आहे आणि वाऱ्याला पंखादेखील आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर आलेल्या बंधनांचा बागुलबुवा न करता आपल्यापेक्षा प्रखर जीवनसंघर्ष करणाऱ्या भोवतालच्या माणसांबरोबर आस्थापूर्वक व्यवहार करायचा, की स्वयंकेंद्रित गुर्मीमध्येच राहायचं, हा महत्त्वाचा सवाल आहे. 

परवलीचे शब्द ः जगण्याचा आशावादी दृष्टिकोन, पूर्वग्रहविरहित दृष्टीनं पाहणं, परिस्थितीकडे बघण्याचं स्वातंत्र्य, बंधनांबद्दलचा कांगावा, आस्थापूर्वक व्यवहार 
(शब्दांकन : वर्षा कुलकर्णी) 
 

(या लेखमालेचे आधीचे भाग वाचण्यासाठी www.epaper.esakal.com या लिंकवर क्‍लिक करा.) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com