#Lockdown2.0 : बिहार, उत्तरप्रदेश, ओडिशा, बंगाल येथील कामगारांना किराणा किटचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहरातील स्थलांतरित कामगारांसह हजारो घरेलू कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध संस्था संघटनांनी पुढाकार घेतला आहे. याद्वारे आतापर्यंत सुमारे 450 जणांना महिन्याच्या किराणा मालाचे किट देण्यात आले आहे.

 पिंपरी - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहरातील स्थलांतरित कामगारांसह हजारो घरेलू कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध संस्था संघटनांनी पुढाकार घेतला आहे. याद्वारे आतापर्यंत सुमारे 450 जणांना महिन्याच्या किराणा मालाचे किट देण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहार, उत्तरप्रदेश, ओडिशा, बंगाल येथून शहरात आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांसह स्थानिक घरेलू महिला कामगार, कंत्राटी आणि स्वच्छता कामगार लॉकडाऊनमुळे हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे उत्पन्नही नाही. मुळातच उत्पन्न कमी असल्याने आर्थिक बचतही जवळपास नाहीच. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. नेमकी हीच बाब हेरून शहरातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिटू कामगार संघटना, डीवायएफआय संघटना, योग विद्या हिलींग फौंडेशन, लोकजागर संघटना, जनवादी महिला संघटना यांनी यासाठी पुढाकार घेतला. या सर्वांच्या वतीने पिंपळे सौदागर, भोसरी, बिजलीनगर, निगडी, त्रिवेणीनगर, आकुर्डी, दत्तवाडी, काळभोरनगर, घरकुल वसाहत, रामनगर, सुदवडी, मावळ इ. भागात राहणाऱ्या गरजू कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. डिवायएफआयचे समन्वयक स्वप्नील जेवळे आणि सचिन देसाई यांनी याबाबत माहिती दिली. 

शहरात 24 मार्चपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी आर्थिक आणि धान्यस्वरूपात या संस्था, संघटनांना मदत केली आहे. तसेच सोसायटीतील महिलांनी तांदूळ आणि तूरडाळ दिली. या मोहिमेमध्ये डॉ. सुरेश बेरी, तुकाराम साळवी, सतीश नायर, एस. के. पोन्नपन, देविदास जाधव, गणेश दराडे, तुकाराम साळवी, शैलजा कडुलकर, अपर्णा दराडे आदींनी पुढाकार घेतला. 

व्हॉटसऍप ग्रुपद्वारे लाभार्थी निश्‍चिती 
जनवादी महिला संघटनेचा एक, डिवायएफआयचे तीन, सीपीआय (एम)चा एक आणि अन्य एक अशा एकूण सहा व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून खरेच गरजू लोकांची निश्‍चिती करण्यात आली. काही ठिकाणी या संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांच्या घरी जाऊनही पाहणी केली. त्यानंतरच त्यांना मदत देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Essential kit distribution to bihar up odisha bengal worker