Coronavirus : गरजूंना मदत, अन्नदान अन् आर्थिक निधी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

‘वाट दिसू दे’द्वारे पोलिसांची साद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये व स्वत:चा बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर कसे पाळावे याबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ पुणे पोलिसांनी तयार केला आहे. यात मराठी चित्रपटातील ‘‘वाट दिसू दे गा देवा’’ या गाण्याचा वापर करीत पोलिसांनी नागरिकांना भावनिक साद  घातली आहे.शहरातील महत्वाचे रस्ते, चौक,  स्वारगेट बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, धार्मिक ठिकाणे तसेच शनिवारवाडासारख्या ऐतिहासिक वास्तू आदी भागांचे व्हिडिओसाठी ड्रोनव्दारे शूटिंग करण्यात आले आहे. विविध रस्त्यांवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस हे वाहनचालकांची तपासणी करतानाची दृश्ये यात दाखविण्यात आली आहेत. या व्हिडिओमध्ये एका मराठी चित्रपटातील ‘‘वाट दिसू दे गा देवा’’ या गीताचा समर्पक वापर करण्यात आला आहे.

पुणे - लायन्स क्लब ऑफ सारसबाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 
जिल्हाधिकारी नवल किशोर राम, लायन्स क्लब सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता, लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, खजिनदार योगेश शहा, संतोष पटवा, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया या वेळी उपस्थित होते. पुणे व्यापारी महासंघ आणि पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने अधिकाधिक व्यापारी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरीव मदत करतील, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांना ड्रायफूडचे वाटप
पुणे -
 जाणीव फाउंडेशन व राष्ट्रीय सलोखा समितीतर्फे बिबवेवाडी व सहकारनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांना  ड्रायफूडचे वाटप करण्यात आले. ड्रायफूड्‌सचे बॉक्‍स पोलिस निरीक्षक कुमार घाडगे व नंदकुमार बिडवई यांच्याकडे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सुपूर्त केले. या उपक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे, राष्ट्रीय सलोखा समितीचे अमोल जोगदंड, अविशेठ वांगी, विकी शेट्टी, महिपाल देवल, जयेश पटवा, गोपाळ कांबळे, वैभव वांढरे, प्रणव कांबळे, श्‍याम बोबडे यांनी सहकार्य केले.

आर्थिक मदतीची मागणी 
सिंहगड रस्ता -
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन, बस चालक आणि मालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सिंहगड रस्ता विद्यार्थी वाहतूक संघटना आणि पुणे शहर विद्यार्थी वाहतूक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सिंहगड रस्ता भागातील विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संस्थापक योगेश बुऱ्हाडे, पुणे शहराध्यक्ष विशाल गोरड, उपाध्यक्ष प्रवीण जागडे, कार्याध्यक्ष संजय पवार यांनी दिली. 

तेजज्ञान फाउंडेशनकडून आभार 
शिवाजीनगर -
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत तेजज्ञान फाउंडेशनच्या १८००० पेक्षा जास्त साधकांनी रविवारी (ता. ५)  रात्री ९ वाजता ९ मिनिटांपर्यंत दिवे लावून देशातील तसेच जगातील सर्व डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कर्मचारी, तसेच कोरोना या महामारीविरुद्ध लढणार्‍या सर्व लोकांना धन्यवाद दिले. तसेच या जागतिक संकटातून लवकरच सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थनाही केली.तत्पूर्वी, पावणेनऊ वाजता तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्रींनी यू-ट्यूब प्रवचनाद्वारे एक संदेश दिला. त्यांनी सर्वांना जबाबदारी, खबरदारी तसेच समजदारीने कार्य करण्यास सांगितले. कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे बळ मिळू शकेल, असे ते म्हणाले.

महिलांना मदत
पुणे -
 लॉकडॉउनमुळे सध्या देहविक्री करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या महिलांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवार पेठेतील पोलिस चौकीतून या महिलांचा प्रश्‍न समोर आला आणि त्यांच्या मदतीसाठी संघाचे स्वयंसेवक पुढे आले. वैयक्तिक संपर्कातून सुरुवातीला १७५ महिलांना पुरेल एवढा शिधा स्वयंसेवकांनी गोळा केला. तसेच, सर्व काळजी घेत भटारखाना सुरू केला. विशेष म्हणजे आचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने यासाठी कोणतेच पैसे घेतले नाही. केवळ काम करणाऱ्या मजुरांना पैसे मिळावे अशी अट घातली. या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर राजकीय कार्यकर्त्यांसह समाजिक संस्थाही सरसावल्या. आता सुमारे तीनशे जणांना पुढील पंधरा दिवस पुरेल एवढा शिधा गोळा झाला आहे. भटारखाण्यात तयार केलेले अन्न सर्व सुरक्षितता पाळत महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले जात आहे.

चिंचवडमध्ये पोलिसांना मास्क
पिंपरी - चिंचवडमधील ऑल इंडिया स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली व स्वानंद महिला संस्था यांच्याकडून पोलिसांना सोमवारी (ता. ६) मास्क देण्यात आले. सुभाष मालुसरे आणि धनंजय कुलकर्णी यांच्याकडे सुरेखा कटारिया आणि प्रा. प्रकाश कटारिया यांनी मास्क सुपूर्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food aid and financial assistance to the needy