अशी केली मात : सतरा दिवसांचा खंबीर लढा

ज्ञानेश सावंत
Thursday, 9 April 2020

पुस्तकांची साथ
आदितीच्या आईबाबांनी गेल्या महिनाभरात अनेक पुस्तके वाचली. त्यात स्वातंत्र्यवीर 
वि. दा. सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक वाचल्याचे आवर्जून सांगितले. त्यानंतर रॉबर्ट कियोसाकी यांचे ‘रिच डॅड पुअर डॅड’, वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ आदी पुस्तके वाचल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही तिघेही बरे झाले आहोत. रुग्णालयामधून घरी येऊन १५ दिवस होत आले तरी एकाही व्यक्तीच्या संपर्कात आलो नाही. डॉक्‍टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत आहोत. चांगला आहार, योग आणि वाचन हे आमचे रुटीन आहे.
- आदितीचे बाबा

कोरोनाबाधित आईबाबांच्या मुलीची धीरोदात्त कहाणी
पुणे - परदेशात गेलेल्या आई-बाबांमुळं तिलाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतरचे १७ दिवस नायडू रुग्णालयात काढले. रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला, ती बरी झाली अन्‌ घरी आली. कोरोनाच्या संसर्गानं न खचता ती रोज आपल्या ऑफिसचं कामही करतेय; पण ‘वर्क फॉर्म होम’. एवढंच नाही तर सकाळी योगा करतेय, घराच्या टेरेसवर तास-दीडतास फिरतेही...कोरोनावर मात करीत ती मानसिक-शारीरिकदृष्ट्या फीट आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर असलेल्या आदितीची (नाव बदलले आहे) ही एक छोटीशी गोष्ट...आदितीच्या आधी नायडू रुग्णालयामध्ये दाखल झालेले तिचे आईबाबाही ठणठणीत झालेत. 

आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक मार्चला दुबईला गेलेल्या आदितीच्या आईबाबांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर तिलाही संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आणि हे तिघे रुग्णालयामध्ये दाखल झाले. त्यांच्या १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना गुढीपाडव्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतरही होम क्वारंटाइनची सक्ती झाली. या तिघांना कोरोनाची बाधा होऊन गुरुवारी (ता. ९) महिना झाला. त्यानिमित्ताने आदितीच्या कुटुंबीयांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपनीत आदिती काम करते. कोरोना झाल्यापासून ती ऑफिसला गेली नाही. तशी ती (सध्या तरी) जाऊही शकत नाही. महिनाभरापासून काम झाले नसल्याने तिने वरिष्ठांशी बोलून वर्क फॉर्म होमची परवानगी घेतली. त्यात ती रोज चार तास काम करतेय. आदिती म्हणाले, ‘‘मुळात रुग्णालयातही आईबाबा सोबत असल्याने फारसे काही वाटले नाही. आता तर मी पूर्ण बरी झाली आहे. घरात आम्ही एकमेकांची काळजी घेत आहोत. आमच्या आवडीनिवडी सांभाळत आहोत. मी स्वत: घरातून ऑफिसचे काम करीत आहे.’’

महाराष्ट्र महत्त्वाच्या टप्प्यावर  
वाढती रुग्णसंख्या हा साथ नियंत्रणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यातून रुग्णांची निश्‍चित संख्या पुढे येते. तो कुठपर्यंत पसरला आहे, याची माहिती मिळते. त्यामुळे त्याच्या नियंत्रणाचे आराखडे त्या आधारावर आखता येतात. आपण सध्या या टप्प्यातून पुढे जात आहोत. देश लॉकडाउन केल्यानंतर परदेशातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. तसेच, त्यांच्या संपर्कात रुग्णांची संख्याही कमी झाली. आता जे रुग्ण आढळत आहेत, त्यातील बहुतांश जणांना स्थानिक संसर्ग झाला आहे. हे रुग्ण कोणत्या भागात मोठ्या संख्येने आहेत, ते देखील यातून कळते. राज्यातील ३६ पैकी २३ जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. पण, त्यापैकी ६३ टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत, तर १५ टक्के रुग्ण पुण्यातील आहेत. म्हणजे राज्यातील ७८ टक्के रुग्ण पुणे, मुंबईत आहेत. त्यामुळे राज्यात साथ नियंत्रित करण्यासाठी या दोन शहरांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, हे यातून स्पष्ट होते. तसेच, या शहरातील नेमक्‍या कोणत्या भागातून रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे, या माहितीवरून त्या भागावर साथ नियंत्रणाची प्रभावी उपाययोजना करणे शक्‍य असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl report negative after 17 days fight against corona