#Lockdown2.0 : शासकीय अधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील आदिवासी गावांना दिल्या भेटी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

वडगाव मावळ - गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मावळ तालुक्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. यापुढील काळातही प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर तहसीदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्यधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या पथकांनी आदिवासी गावांना भेटी दिल्या. किवळे, इंगळूण, कुणे-अनसुटे, पिंपरी, माळेगाव, माऊ, वडेश्वर, सावळा, कुसवली, कुसुर, खांडी, बेलज, कुणे नामा, उधेवाडी, शिरदे, राकसवाडी, जांभवली आदी गावांना त्यांनी भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधला. आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स मार्फत सुरु असलेल्या गृहभेटींची त्यांनी माहिती घेतली.

ग्रामपंचायतींच्या मार्फत केल्या जाणाऱ्या औषध फवारणी, स्वच्छता मोहीम, मास्क व सॅनिटाइझर वाटप व जनजागृती उपक्रमांबाबत त्यांनी पाहणी केली. अन्नधान्य वाटपाचीही त्यांनी माहिती घेतली. अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत आश्वासीत केले. प्रत्येक गावात ५० खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी जागांची पाहणी केली. परिसरातील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांनाही भेटी देऊन तेथील कामकाजाची व शिघ्र प्रतिसाद पथकांची माहिती घेतली.

सावळा - आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेताना शरदचंद्र माळी व डॉ.चंद्रकांत लोहारे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government officials give visits to tribal villages in Maval taluka