कामशेत बाजारपेठेत पुन्हा लॉकडाऊन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार दोन दिवस वगळून सोमवार व मंगळवारी (13,14) दोन दिवस कामशेत बाजारपेठ पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कामशेत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार दोन दिवस वगळून सोमवार व मंगळवारी (13,14) दोन दिवस कामशेत बाजारपेठ पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे व सरपंच रुपाली शिनगारे यांच्या उपस्थितीत व्यापारी असोसिएशन व मेडिकल असोसिएशन यांची बैठक पार पडली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनात देखील वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गुरूवार ता.९व शुक्रवार ता.१०ला लाॅकडाऊनला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या दोन दिवसात गावकऱ्यांनी स्वयंप्रेरणने लाॅकडाऊन करून घेतले होते.

शनिवारपासून शहरातील जीवनावश्यक किराणा दुकाने व अत्यावश्यक मेडिकल दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाजी विक्रेते ज्यांचा कायमस्वरूपी गाळा आहे. ते भाजी विक्री करु शकतात, परंतु नवीन भाजी विक्रेते यांना ग्रामपंचायत आदेशानुसार जागा ठरवून दिली जाईल. त्याचे पालन विक्रेत्यांनी करायचे आहे. अन्यथा त्यांचा भाजीपाला ग्रामपंचायतकडून जप्त करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

सत्तरहून अधिक गावांची ही बाजारपेठ असल्याने येथे नागरिकांची खरेदी साठी सतत वर्दळ असते. शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणीही विनाकारण मोटारसायकलवर फिरताना आढळून आल्यास पोलिस प्रशासनाकडुन वाहने जप्त करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्क न बांधता फिरताना आढळून आल्यास अशा नागरिकांना देखील कायदेशीर दंड व कडक कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock Down again Started in Kamshet