लॉकडाऊन आता आणखी कडक; अनेक सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

- .आजपासून बारामतीकरांची खरी परीक्षा सुरु.

शोधमोहिम सुरु

बारामती : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांची खरी परीक्षा आता सुरु झाली आहे. शहरातील एका भाजीविक्रेत्याच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आता भाजीपाला, फळे, चिकन, मटण, मासळी यांची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी काल रात्री उशीरा हे आदेश जारी केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात 30 मार्च रोजी कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर शहरातील भिगवण रस्त्यानजिकचा सर्व भाग सील करण्यात आला होता. त्यानंतर 6 एप्रिल रोजी एका भाजीविक्रेत्या कुटुंबातील व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. भाजीविक्रीसाठी उडणारी नागरिकांची झुंबड हा अगोदरच शहरात चर्चेचा विषय होता, त्यात एका भाजीविक्रेत्याच्या कुटुंबातील सदस्याला लागण झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत भाजी, फळांसह चिकन, मटण व मासळीबाजारालाही लॉकडाऊनच्य कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला. सोशल डिस्टसिंग पाळले जात नसल्याने अखेरचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेला.

दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत आता बारामतीतील फक्त औषधे, किराणा, शेतीपूरक तसेच दूधविक्रीचीच दुकाने सुरु राहणार आहेत. बारामती शहरातील भिगवण रस्त्यानजिकचा तसेच आता गुनवडी चौकापासून खालील बाजूचा भाग प्रशासनाने सील केल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे. 

शोधमोहिम सुरु

ज्याला कोरोनाची बाधा झाली आहे, ती व्यक्ती गेले काही दिवस घराबाहेर पडलेली नव्हती, त्यामुळे त्या व्यक्तीला इतर कोणामुळे तरी बाधा झाली असावी, असा प्रशासनाचा कयास आहे, त्या दृष्टीने संबंधित व्यक्तीचे कुटुंबिय व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी बनविण्याचे काम सुरु होते. आज या संदर्भात प्रशासनाकडून या व्यक्तींना होम कोरोटांईन करण्यासह त्यांच्या तपासण्या करण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. 

घराबाहेर पडू नका

नागरिकांनी कोरोनाची शक्यता विचारात घेता घराबाहेर पडू नका, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे व आपल्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock Down Vegitable and Food Ban in Baramati