पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 15 हजारांहून अधिक गरजू लोकांना जेवण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

देणाऱ्याने देत जावे..घेणाऱ्याने घेत जावे.. घेता घेता एक दिवस.. देणाऱ्याचे हात घ्यावे अशी जीवनकवी विंदा करंदीकर यांची सुपरिचित कविता आहे. सध्या त्याचीच सर्वत्र अनुभूती येत आहे. शहरातील अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था दररोज सुमारे 15 हजारांहून अधिक गरजू आणि गोरगरीब लोकांना जेवण पुरविण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी खास काही ठिकाणी "कम्युनिटी किचन' देखील तयार करण्यात आली आहेत.

पिंपरी - देणाऱ्याने देत जावे..घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस.. देणाऱ्याचे हात घ्यावे अशी जीवनकवी विंदा करंदीकर यांची सुपरिचित कविता आहे. सध्या त्याचीच सर्वत्र अनुभूती येत आहे. शहरातील अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था दररोज सुमारे 15 हजारांहून अधिक गरजू आणि गोरगरीब लोकांना जेवण पुरविण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी खास काही ठिकाणी 'कम्युनिटी किचन' देखील तयार करण्यात आली आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अप्पर तहसिलदार कार्यालय, पिंपरी-चिंचवड आणि महापालिका यांच्या सहकार्याने शहरात दहापेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था-संघटना विविध भागांतील गरजू लोकांसाठी यथाशक्ती जेवण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. श्री काळभैरवनाथ उत्सव समितीतर्फे, लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून गरजू लोकांना जेवण दिले जात आहे. समितीकडून सध्या रोज 13 हजारांहून अधिक लोकांना जेवण पुरविले जात आहे. त्यासाठी चिंचवडगाव येथील मोरया यात्री निवास आणि धनेश्‍वर मंदिराजवळ "कम्युनिटी किचन' सुरु करण्यात आले असल्याची माहिती ओंकार गौरीधर यांनी दिली. या कार्यासाठी अडीचशे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. डुडूळगाव, चिखली, चिंचवड, पिंपरी आदी शहरातील बहुतेक सर्व ठिकाणी हे जेवण पुरविले जात आहे. 

पिंपरी-चिंचवड विहार सेवा ग्रुपतर्फे, पिंपळे सौदागर, वाकड, बिजलीनगर, आकुर्डी भागांतील गरजू लोकांना जेवण दिले जात आहे. त्यांची संख्या जवळपास 1500 इतकी आहे. याखेरीज, जितो संघटनेतर्फे, आतापर्यंत 5 हजार धान्य पाकिटे वितरीत करण्यात आली असल्याचे राहुल लुंकड यांनी सांगितले. 

वाल्हेकरवाडी येथील संस्कार सोशल फाऊंडेशनमार्फत, रावेत येथे "कम्युनिटी किचन' बनविण्यात आले आहे. 5 गाड्यांमधून रोज 1100 लोकांबरोबरच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनाही जेवण दिले जात आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत आमचा जेवण देण्याचा प्रयत्न राहील, असे बाळकृष्ण खंडागळे-पाटील यांनी सांगितले. 

मोशी येथील लक्ष्य फाऊंडेशनचे मार्फत, सुरुवातीला 450 पाकिटे शिधावाटप करण्यात आले. मात्र, आता रोज दररोज 1200 लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. खडीमशीन,मोशी, रहाटणी, बनकरवाडी, बोऱ्हाडेवाडी, घरकुल, गांधीनगर, पिंपरी रेल्वे स्थानक, आळंदी रोड आदी भागांत संस्थेचे कार्य चालू असल्याचे दिनानाथ जोशी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meals for more than 15000 needy people every day in Pimpri Chinchwad