Coronavirus : पुण्यातील भवानीपेठ परिसरात सर्वाधिक रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

ढोले पाटील, धनकवडीत प्रत्येकी १२ जण 
ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 12, धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 12 , तर कसबा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 23 कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आढळून आलेल्या रुग्णांची बेरीज केल्यानंतर येणाऱ्या संख्येएवढी रुग्ण एकट्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे - पुणे शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ४६ रुग्ण हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळले आहेत. त्या खालोखाल कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २३, तर ढोलेपाटील व धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी बारा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात एकूण रुग्ण संख्येच्या ३२ टक्के रुग्ण हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात असल्याचे समोर आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रुग्ण नऊ मार्च रोजी पुण्यात आढळला. त्यास आज एक महिना झाला. आजपर्यंत ही संख्या 144 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आढळून आले आहेत. त्या खालोखाल कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर पेठांचा भाग येतो. अतिशय दाटीवाटीचा आणि जास्त घनतेचा हा भाग आहे. पुणे महापालिकेकडून मिळालेल्या माहितीवरून, या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने पेठांचा भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गतही रविवार पेठ परिसरात सर्वाधिक म्हणजे 9 रुग्ण आढळून आले आहेत. त्या खालोखाल घोरपडी पेठ परिसरात 7, तर गुरुवार पेठ परिसरात 5 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय महात्मा फुले पेठ, मोमीन पुरा, नानापेठ आणि काशीवाडी परिसरात ही रुग्ण आढळून आले आहेत. तर कसबा- विश्रामबाग क्षेत्रीय 
कार्यालयांतर्गत येणाऱ्या मंगळवारपेठ, पर्वती दर्शन गुलटेकडी या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most coronavirus patients in Bhavanipeth area of Pune