देशभरात कोरोनाचे संकट पण इथं घडली दिलासा देणारी घटना

दत्ता म्हसकर
Wednesday, 15 April 2020

चौदा दिवसांच्या उपचारानंतर तिचे कोरोना स्वॅब टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला आज नायडू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जुन्नर : डिंगोरे (ता.जुन्नर) येथील कोरोनाबाधित ज्येष्ठ महिलेवरील चौदा दिवसांच्या उपचारानंतर तिचे कोरोना स्वॅब टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला आज नायडू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही घटना जुन्नर तालुक्याला दिलासा देणारी ठरली आहे. तालुक्यात बुधवार अखेर जुन्नर तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर व गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी सांगितले.

डिंगोरे येथे मुंबईवरून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याचे संपर्कात आलेल्या सुमारे अठरा व्यक्तींची कोरोना चाचणी पुणे येथे करण्यात आली. यावेळी संबंधित रुग्णाच्या आईस कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. तिच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते तर मुबंईहून आलेला तिचा रूग्ण मुलगा व त्याचा भाऊ मुंबईमध्ये उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास पोलिस प्रशासनास सांगण्यात आले आहे. यामुळे प्रशासनास सहकार्य करावे. पुणे व मुंबई येथून कोणी आले असल्यास त्याची माहिती प्रशासन द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No One Coronavirus Positive Case Reported till now in Junnar