चिंताजनक : पुण्यात स्थानिक महिलेला कोरोना; विदेश प्रवास नाही, कोणाशी संपर्क नाही!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या महिला रुग्णावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. 

पुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या महिला रुग्णावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संबंधित रुग्णाने परदेश प्रवास केला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवाय, हा रुग्ण संसर्ग झालेल्या देशातून प्रवास केलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याची माहितीही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे, या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग कसा झाला, याची छाननी अत्यंत काटेकोरपणे सुरू झाली आहे. 

"संबंधित रुग्ण 41 वर्षे वयाची महिला आहे. त्यांना धाप लागत असल्याने सोमवारी (ता. 16) रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा नसल्याने त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले. स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा "एनआयव्ही'ने केला. पण, सध्याच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर "कोविड 19' विषाणूंचीही चाचणी केली. त्या वेळी या रुग्णाला कोरोना झाल्याचे निदान झाले,' अशी माहिती खासगी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

या रुग्णावर खासगी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णाची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, अद्याप या रुग्णाबाबत सरकारी पातळीवरून अधिकृत भाष्य केले नाही. 

परदेशातून प्रवास करून आलेल्या किंवा "कोविड 19' पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी देशभरात सुरू आहे. त्यातून शुक्रवारपर्यंत फक्त महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेले 52 रुग्ण आढळले आहेत. 

शास्त्रीय अभ्यास सुरू

पुण्यात आढळलेल्या या रुग्णाची माहिती राज्य आरोग्य खात्यातर्फे केंद्र सरकारला कळविली असल्याचे काही अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. "एनआयव्ही' आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) या प्रकरणाचा शास्त्रीय अभ्यास करत आहेत.

कोरोनाचा "कोविड 19' विषाणू आणि स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' यांच्यात काही परस्पर संबंध येत आहे का, तसेच या भौगोलिक परिस्थितीचा विषाणूवर काही परिणाम होत आहे का, याचा अभ्यास होत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Woman Infected of Coronavirus in Pune