Coronavirus : कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दानपेट्या खुल्या करा - दिलीप देशमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

धार्मिक देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतील रक्कम कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी द्यावी, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शनीशिंगणापूर देवस्थानने ससून रुग्णालयात तातडीने एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहे. तसेच जेजुरी येथील मार्तंड देवस्थानने ५१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे - धार्मिक देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतील रक्कम कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी द्यावी, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शनीशिंगणापूर देवस्थानने ससून रुग्णालयात तातडीने एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहे. तसेच जेजुरी येथील मार्तंड देवस्थानने ५१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ससून रुग्णालयाला हा निधी सोमवारी उपलब्ध होणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयाकडून उपचारासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. ससून रुग्णालयात ११ मजली इमारत तयार असली. तरी उपचारासाठी आवश्यक व्हेंटिलेटर आणि इतर सामग्री अपुरी आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी लागणार असून यापैकी काही निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्र बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी धर्मादाय सहआयुक्तांना लिहिले. त्यावर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व धार्मिक देवस्थानांनी आपत्तीच्या काळात महत्वाची भूमिका बजावावी. तसेच शैक्षणिक संस्था आणि फाउंडेशन यांनीही राष्ट्रीय आपत्तीच्या काळात पुढे येऊन सरकारला मदत करावी असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त देशमुख यांनी केले आहे. 

अक्कलकोट, रांजणगाव, ओझर यासह इतर देवस्थानां कडूनही दोन-तीन दिवसात निधी उपलब्ध होईल. याबाबत धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांच्यासह अन्य अधिकारी- कर्मचारी प्रयत्नशील असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

सर्व धार्मिक संस्था, देवस्थानच्या विश्वस्तांकडील रक्कम ही जनतेनेच दिलेली आहे. ती जनतेच्या कल्याणासाठीच खर्च झाली पाहिजे आणि हीच ती योग्य वेळ आहे. 
- दिलीप देशमुख, धर्मादाय सहआयुक्त, पुणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open the donation box for the treatment of coronary arteries dilip deshmukh