Coronavirus : बारामतीकरांच्या चिंतेत पुन्हा वाढ; कारण...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

सायलेंट कॅरिअरचा शोध सुरुच

- 14 जणांच्या रिपोर्टची आता प्रतिक्षा

बारामती : शहराच्या म्हाडा कॉलनीतील एक ज्येष्ठ नागरिक कोराबाधित असल्याचे काल सिद्ध झाल्यानंतर आता पुन्हा बारामतीवरील कोरोनाचे संकट गडद होऊ पाहते आहे. 
ज्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, त्यांच्या अत्यंत जवळच्या 7 महिला व 7 पुरुष असा 14 जणांना तातडीने रात्रीच पुण्याच्या औंध रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्टस आज रात्रीपर्यंत येणे अपेक्षित आहे. या सर्वांचे रिपोर्टस काय येतात याच्यावर आता पुन्हा एकदा बारामतीचे भवितव्य अवलंबून आहे.

या रुग्णावर उपचार करणारे एक डॉक्टर, एक्सरे टेक्निशियन व लॅब असिस्टंट यांच्यासह एकूण 22 जण हाय रिस्क झोनमध्ये असून, 14 जणांना तपासणीसाठी नेण्यात आले आहे. उर्वरित जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ज्या डॉक्टरांनी त्यांना तपासले आहे, त्यांना कुटुंबियांपासूनही विलग करण्यात आले आहे. 

दरम्यान, संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेले. मात्र, लो रिस्क कॅटेगरीमध्ये असलेल्यांचाही शोध प्रशासन घेत आहे. संबंधित भाग समर्थनगरच्याच नजीक असल्याने तो अगोदरच सील करण्यात आला असून, या भागातील लोकांच्या वैद्यकीय तपासण्यांचेही काम वेगाने सुरु आहे. 

बारामतीत प्रशासनाने किराणा, भाजी, औषधे, दूध यासारख्या जीवनाश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी नियोजन केलेले असून, त्यामुळे काही प्रमाणात लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. किराणा, भाजी, औषधे यांसारख्या वस्तू एका ऍपद्वारे मागणी नोंदविल्यानंतर ग्राहकांना घरपोच मिळत आहेत. 

सायलेंट कॅरिअरचा शोध सुरुच

रिक्षाचालक, भाजीविक्रेता आणि आता एक ज्येष्ठ नागरिक यांना कोरोनाची लागण नेमकी कोणामुळे झाली हे शोधण्यात अद्यापही अपयशच आलेले आहे. काल निष्पन्न झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचीही बाहेर फारशी ये-जा नव्हती, मग त्यांना कोरोना देणारा सायलेंट कॅरिअर नेमका कोण होता, हे शोधणे आता प्रशासनाचे काम ठरले आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ अधिका-यांनी माहिती गोळा करायला प्रारंभ केला आहे. बारामतीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी असतानाही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Baramati are now in Tension Due to Coronavirus