लॉकडाऊन असूनही बारामतीकर फिरताहेत सर्रासपणे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर जाऊन पोहोचली तरीही लोक सर्रास घराबाहेर फिरत आहेत.

बारामती : शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर जाऊन पोहोचली तरीही लोक सर्रास घराबाहेर फिरत आहेत. लॉकडाऊन असले तरी रस्त्यांवरील दुचाकींची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक जण पोलिसांची नजर चुकवून व ज्या गल्लीत पोलिस बंदोबस्त नाही, अशा गल्ल्यांतून सर्रास रस्त्यांवर फिरुन मजा बघत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी अधिक कुमक मागवून बंदोबस्त ठेवलेला असला तरी ज्या भागात बंदोबस्त नाही, अशा भागात किराणा, औषध, दवाखाना अशी कारणे सांगून लोक बिनधास्त फिरत आहेत. मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकलाही लोक बिनधास्त फिरत असल्याने लॉकडाऊन निरर्थक ठरु लागले आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही बारामतीकर सुधारण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

प्रशासन जीव तोडून घरात थांबा, असे वारंवार आवाहन करीत असूनही लोकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शहरातील रस्त्यांवर दुचाकींची वर्दळ कमालीची वाढली असून विविध कारणे देत लोक रस्त्यावर येत आहेत.
कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहावर जाऊन पोहोचल्याने अधिक कडक उपाययोजनांची बारामतीत गरज असून जनता कर्फ्यूसारखी उपाययोजना करावी लागणार असल्याचे जागरुक नागरिकांना वाटते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Baramati Not Following Lock Down Rule