बारामतीकरांना काही अंशी मिळाला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

शिवभोजन थाळी अधिक व्यापक

- भिलवाडा पॅटर्ननुसार कामकाज सुरु

बारामती : शहरात लॉकडाऊन व आता भीलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी सुरु केल्यापासून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गेल्या दोन दिवसात पुण्याला कोणत्याही रुग्णाला पाठवण्यात आले असून, रिक्षाचालक व भाजीविक्रेत्या कोरोनाबाधिताच्या कुटुंबियांची प्रकृतीही ठणठणीत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीत रिक्षाचालक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर भिगवण रस्त्याच्या बाजूचा परिसर पोलिसांनी सील केला होता, त्याला रविवारी (ता. 12) दोन आठवड्यांचा कालावधी होईल. या भागातील कुटुंबाची तपासणी सुरुच असून, यात कोणीही संशयित आढळला नसल्याचे सांगितले गेले. या भागातील लोकांनीही लॉकडाऊनचे चांगले पालन केल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले. 

रिक्षाचालकाच्या कुटुंबियांना बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात कोरोटांईन करुन ठेवण्यात आले होते, त्यांनाही तपासणीनंतर सोमवारपर्यंत घरी सोडले जाणार आहे. शहर व तालुक्यात कोणीही संशयित बाधित रुग्ण नसला तरी आगामी काही दिवस कमालाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. खोमणे यांनी व्यक्त केले. 

भिलवाडा पॅटर्ननुसार कामकाज सुरु

दरम्यान बारामतीच्या प्रत्येक वॉर्डनिहाय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, जीवनाश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दूध, भाजीपाला व किराणा सामानही घरपोच देण्याची तयारी केल्याची माहिती अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली. नागरिकांनीही या यंत्रणेमार्फत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, रस्त्यावर येण्याचा कुणी प्रयत्न करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

शिवभोजन थाळी अधिक व्यापक

बारामतीत हातावरचे पोट असलेल्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत पाच ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रयत भवन येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, तांदुळवाडी येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने, गणेश मार्केट व खंडोबानगर येथे दुध संघाच्या वतीने 900 जणांच्या दोन्ही वेळेसच्या जेवणाची सोय करण्यात आल्याचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात आणखी 600 जणांची अतिरिक्त व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचेही सातव यांनी नमूद केले. 

पोलिस बंदोबस्त मजबूत केला

दरम्यान भीलवाडा पॅटर्ननुसार कामकाज सुरु झाल्यानंतर जागोजागी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून रस्त्यावर विनाकारण दिसणा-यांच्या दुचाकी जप्त करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

नियोजन झाले

भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने पुरेशी तयारी केली आहे. मेडिकल कॉलेजच्या तीन इमारतीत 150 रुग्णांची सोय करता येईल, या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करुन ठेवलेले आहे. व्हेंटीलेटर्ससह पूरक यंत्रणेचीही तयारी करुन ठेवण्यात आली असून, अनेक खाजगी डॉक्टरांनीही प्रसंगी शासकीय यंत्रणेस सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिलेली आहे. 

महिंद्राकडून 1000 फेस शेल्टर्स

पोलिस, वैद्यकीय कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी महिंद्रा कंपनीच्या वतीने एक हजरा फेस शेल्टर्स प्रदान करण्यात आली आहेत. पोलिस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचा-यांना बारामतीचे सुपुत्र व महिंद्रा कंपनीचे संचालक सुनील चाहुरे यांनी ही मदत करण्याकामी पुढाकार घेतला.

वैभव तावरे, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मुख्याधिकारी योगेश कडुसकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. जवळपास पाच लाख रुपये किंमतीचे हे फेस शिल्ड आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Baramati now get few Relief