कोरोनातून झाला बरा मग...

पीतांबर लोहार
Tuesday, 21 April 2020

- कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील व्यक्तीचे सर्वधर्मीय नागरिकांकडून जोरदार स्वागत

- रांगोळीच्या पायघड्या; टाळ्या वाजवून व गुलाबपुष्प देऊन अभिनंदनाचा वर्षाव

पिंपरी : तो तरुण. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली प्राधिकरणातील उभारलेल्या घरकुल वसाहतीत राहतो. दुर्दैवाने तो एका धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमध्ये आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी तपासणी केली.

सर्दी, खोकला, ताप होता. लक्षणे कोरोनाची दिसली. म्हणून डॉक्टरांनी त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेतले. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीकडे तपासणीसाठी पाठवले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले. पाॅझिटिव्ह. रुग्णालयातील डॉक्टरांसह महापालिका प्रशासनही हादरले. हा तरुण कोणाकोणाच्या संपर्कात आला याचा शोध सुरू झाला. तो राहत असलेली संपूर्ण सोसायटी सील केली. नागरिकांची तपासणी केली. इकडे तरुणावर उपचार सुरू झाले. तो दिवस होता एप्रिल महिन्याची दोन तारीख.

डॉक्टरांनी सर्व अनुभव पणाला लावत त्याच्यावर उपचार सुरू केले. एकेक दिवस सरत गेला. हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील रुग्णांची संख्या वाढत गेली. शहरात भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले. विशिष्ट धर्माच्या व्यक्तींविषयी समाजमनात नकारात्मक भावना निर्माण होऊ लागली. चीड निर्माण होऊ लागली. तो तरुण राहत असलेल्या परिसराची व सोसायटीची चर्चा शहरभर पसरली. इकडे, रुग्णालयात डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले होते. बघताबघता चौदा दिवस संपले. त्याच्या घशातील द्रवाचे नमुने पुन्हा घेण्यात आले. ते तपासले. रिपोर्ट निगेटिव्ह आला.

डॉक्टरांसह त्याच्याही चेहऱ्यावर आनंद झळकला. पण, नियमानुसार चोवीस तासांच्या अंतराने पुन्हा घशातील द्रवाचे नमुने घेऊन तपासायचे होते. ते निगेटिव्ह आले तरच त्याला घरी सोडण्यात येणार होते. त्यामुळे सर्वांनाच थोडी चिंता होती. कारण, त्याच्यासोबत रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे रिपोर्ट चौदा दिवसांच्या उपचारानंतरही पाॅझिटिव्ह आले होते. त्याला आणखी चौदा दिवस उपचारासाठी रुग्णालयात थांबावे लागणार होते. याच्या बाबतीही असेच घडले तर,...हा तरच त्याच्यासह डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना टेन्शन देणारा ठरत होता. अशा स्थितीत त्याचे नमुने घेतले.

दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला निगेटिव्ह. आणि सर्वांचे चेहरे फुलले. पाॅझिटिव्ह विचार मनात आले. आपण कोरोनावर मात करू शकतो, या विचाराने सर्वांना बळ मिळाले. डिस्चार्जचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले. त्याला रुग्णालयाबाहेर आणले. रुग्णवाहिका उभीच होती. तिच्यावर लिहिले होते, 'पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णवाहिका. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी.' हे वाचून सर्वांच्या माना उंचावल्या. त्याला सुद्धा अभिमान वाटला. महापालिका रुग्णालयाचा. रुग्णवाहिका निघाली. त्याचे विचार चक्र सुरू झाले होते.

'कोरोनातून बरा झालो असलो तरी, चौदा दिवस घरातच राहायचं. होम क्वारनटाइन. पण, आपल्याविषयी शेजारी काय म्हणतील. त्यांच्या मनात काय सुरू असेल. सोसायटीतील लोक काय म्हणतील. 'मनात विचारांचा घोळ सुरू होता. एकीकडे चौदा-पंधरा दिवसांनी घरी जाण्याचा आनंद तर दुसरीकडे 'लोक काय म्हणतील', याची भिती. थोडं वळण घेऊन रुग्णवाहिका थांबली. याची तंद्री भंगली. दरवाजा उघडला गेला. भीतभीतच हा रुग्णवाहिकेतून खाली उतरला. टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

सोसायटीतील सर्वजण सोशल डिस्टंन्सिग राखून ओळीत उभे होते. दोन्ही बाजूला. मध्ये रांगोळी काढलेली होती. इंग्रजीत लिहिले होते, वेलकम. सर्वांना त्याने हात उंचावून हाय केले. सोसायटीच्या प्रतिनिधीने गुलाबाचे फुल देऊन त्याचे स्वागत केले. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. त्यात कोणी हिंदू होते. कोणी मुस्लिम होते. कोणी बौद्ध तर कोणी ख्रिश्चन. सर्व जाती धर्मातील लोक होते.

सर्वांची भावना एकच होती, 'आमच्या सोसायटीतील माणूस कोरोनावर मात करून परत आलाय. आमच्यासारखे नाॅर्मल जीवन जगायला.' यातून त्यांची एकता दिसून आली. भाईचारा दिसून आला. 'असेच आपण सर्व मिळून कोरोनावर मात करू या. घरातच थांबू या' कोणी तरी पुटपुटलंं आणि रुग्णवाहिका सुरू झाल्याचा आवाज आला. तिच्या चालकाला व त्या सोबत आलेल्या कर्मचा-यांना बाय करण्यासाठी सर्वांच्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या पण, तोपर्यंत रुग्णवाहिका निघून गेली होती. पुढच्या रुग्णाला घरी सोडण्यासाठी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples welcome who corona test negative