जमावबंदीचा आदेश मोडू नका; नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याने पाच जणांवर रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याने पाच जणांवर रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासनाने जमावबंदीचा आदेश देऊनही पाचजण येथील पुणे-नगर रस्त्यावर राजमुद्रा चौकात विनाकारण उभे होते. यासदर्भात हवालदार प्रफुल्ल भगत यांनी रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

अनंता कोंडीबा घोडे (वय ५०), शरद अनंता घोडे (वय २१,) रामचंद्र भगवंत पऱ्हाड (वय २३,), माधव तेजराव कवडे (वय २५) सर्व रा. रांजणगाव गणपती व गणेश आनंदा शेवाळे (वय २३, रा. निमगाव भोगी) या पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर पाच जणांना रस्त्यावर गर्दी करून उभे राहाऊ नका असे स्थानिक नागरिकांनी सांगूनही ते पुणे - नगर रस्त्याच्या कडेला रांजणगाव येथे उभे राहिले होते.

तसेच शासकीय वाहनातून जात असताना सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी सध्या जमावबंदीचा आदेश जारी असूनही तुम्ही येथे थांबू नका, असे सांगूनही सदर आरोपींनी शासकीय आदेशाचे पालन न करता जमाव करून उभे राहिले, त्याबद्दल वरील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Taking Action against who breaks Curfew