पुण्यात प्लाझ्मा थेरपीची तयारी पूर्ण 

योगीराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 April 2020

पुण्यासह देशातील सुरत, जयपूर आणि तिरुअनंतपूरम या शहरांमधील वैद्यकीय महाविद्यालयांनी प्लाझ्मा थेरपीसाठी अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. 

पुणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रुग्णाचा विमा आणि अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मान्यता या दोन तांत्रिकबाबींच्या पूर्ततेतनंतर प्लाझ्मा थेरपी प्रत्यक्षात करण्यात येईल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यासह देशातील सुरत, जयपूर आणि तिरुअनंतपूरम या शहरांमधील वैद्यकीय महाविद्यालयांनी प्लाझ्मा थेरपीसाठी अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. रुग्णाचा विमा आणि एफडीएची मान्यता या दोन बाबी पुढील दोन दिवसांमध्ये पूर्ण होतील. त्यानंतर भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) प्लाझ्मा थेरपीसाठी हिरवा कंदील दाखवेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जगभरात कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. मात्र, त्यावर रामबाण औषध अद्यापही उपलब्ध नाही. अशा वेळी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर करून कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्याचे प्रयोग सुरू आहेत. प्लाझ्मा थेरपी हा त्यापैकीच एक आहे. 

या थेरपीसाठी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आयसीएमआरशी पत्रव्यवहार केला होता. त्याला सकारात्मक आयसीएमआरने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

प्लाझ्मा थेरपीसाठी अत्यावश्यक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रशिक्षण अशा दोन्ही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता झाली आहे. त्या पाठोपाठ आता क्लिनिकल ट्रायल करणाऱ्या रुग्णाचा विमा उतरविणे बंधनकारक आहे. याची प्रक्रिया सुरू आहे. सुरतमधील वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णाचा विमा स्वतः उतरविला आहे. त्यामुळे तेथे प्लाझ्मा थेरपी सुरू झाली. मात्र, पुण्यासह जयपूर आणि तिरुअनंतपूरम येथे ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने मान्यता मिळेल, असा विश्वास आयसीएमआरने या चारही महाविद्यालयाच्या एकत्रित बैठकीत व्यक्त केला. 

असे होणार उपचार 
१. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाने दान केलेले रक्त घेणार 
२. अत्यवस्थ रुग्णांना प्लाझ्मा देण्यात येणार 

दात्यासाठी निकष 
१. कोरोनामुक्त झाल्यानंतर घरातील चौदा दिवसांच्या विलगीकरणात दात्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नसावीत 
२. रुग्णाच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबाँडीज असव्यात. 
३. दात्याचा विमा उतरवलेला असावा व या प्रक्रियेला अन्न व औषध प्रशासनाची मान्यता असावी 

 

प्लाझ्मा थेरपीसाठी महाविद्यालयाच्या इथिक्स समितीची मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्यासाठी परवानगी मिळाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आयसीएमआरची अंतिम मान्यता मिळेल. त्यानंतर कोरनामुक्त झालेल्या व्यक्तीने दान केलेल २०० मिली रक्तातील प्लाझ्मा अत्यवस्थ रुग्णांना दिला जाईल. 
- डाँ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for plasma therapy completed in Pune