अगदी रिकामे बसा, पण स्क्रीन टाळा! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

सध्या घरी आहात म्हणून सतत कोणत्याही स्क्रीनसमोर बसू नका, एखाद्या छंदात मन रमवा. मुख्य म्हणजे कुठलिही ब्रेकिंग न्यूज अजिबात पाहू नका, असा सल्ला मानसरोगतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी दिला आहे.

पुणे - सध्या घरी आहात म्हणून सतत कोणत्याही स्क्रीनसमोर बसू नका, एखाद्या छंदात मन रमवा. मुख्य म्हणजे कुठलिही ब्रेकिंग न्यूज अजिबात पाहू नका, असा सल्ला मानसरोगतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी दिला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे जगभरच अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे सगळेजण घरी बसले आहेत. रिकामे काय बसायचे म्हणून सतत कशात तरी गुंतवणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, खुशाल रिकामे बसा, पण मुद्दाम कोणत्या तरी कामात गुंतवून घेत राहू नका. आपण यंत्र नाही आहोत, त्यामुळे गुंतवून घेण्याची सक्ती मनावर करू नका, असा सल्ला डॉ. कुलकर्णी यांनी दिला आहे. स्वतःला सतत गुंतवून ठेवण्याची सक्ती मनावरचा ताण वाढवणारी असते, असा इशाराच त्यांनी दिला. त्या ऐवजी अगदी रिकामे बसा, कुटुंबियांशी गप्पा करा, आवडत्या छंदात मन रमवा, पण सतत कोणत्याही स्क्रीनसमोर बसू नका. सध्या प्रत्येकजण मोबाईल, टिव्ही आणि संगणकाच्या पडद्यासमोर असतात. हा स्क्रीनटाइम पूर्ण कमी करा, असे त्यांनी सांगितले. 

डॉ. हिमानी कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘या साथीच्या आजाराचा सामना करताना आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांना सामोरे जाताना आपण प्रचंड अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झालो आहोत, हे समजू शकतो. अनेक प्रकारचे ताण आले असतील आणि प्रत्येक व्यक्ती व्यक्तिमत्त्वानुसार प्रतिक्रिया देऊ लागली आहे. काहींमध्ये अति प्रमाणात अस्वस्थता, आरोग्य, संपत्ती, भविष्य, नोकरी, प्रिय जनांविषयीच्या काळजी वाटते आहे. यामुळे घाबरलेपण, श्वास घेण्यास त्रास होणे, झोप न लागणे, घाम येणे, घसा खवखवणे किंवा कणकण जाणवणे अशी लक्षणे दिसू लागली आहेत. तसेच नैराश्याचे विचार, प्रेरणेचा अभाव, आपण करत असलेल्या कामात आनंद न मिळणे असेही अनुभव येत आहेत. सोयी सुविधांचा अभाव आणि बदललेल्या दैनंदिन कामाशी जुळवून घेता येत नसल्याने नैराश्य वाढत आहे. अशावेळी शांत बसण्याची सवय लावून घ्या.’’ 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘आता पुढे काय होणार’ याऐवजी ‘मला संसर्ग झालेला नाही’ असा विचार करावा. गाणे म्हणणे, गाणे ऐकणे, वाचन, चित्र काढणे, स्वच्छता, व्यायाम, बागकाम यासारखी कामे वारंवार करणे याद्वारे मनातील नकारात्मक विचारांचे चक्र आपल्याला थांबवता येईल. या कामांमुळे स्नायू शिथील होऊन अस्वस्थतेचे विचार दूर होतील. योगासने, दीर्घ श्वसन, रिलॅक्सेशन याद्वारेही चीड येणाऱ्या गोष्टी कमी होतील. मनातील अनावश्यक गुंता कमी झाला की, नैराश्याचे विचार कमी होतील. मुलांना चिरणे, धान्य निवडणे, धुणे इत्यादी जीवनकौशल्ये शिकवण्यात गुंतवा, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

हे करा... 
गाणे म्हणणे 
गाणे ऐकणे 
वाचन 
चित्र काढणे 
स्वच्छता 
व्यायाम 
बागकाम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psychiatrist Advice to Enjoy Your Favorite Hobbies

Tags
टॉपिकस