Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात प्रवास करू देण्याची परवानगी देण्याचा निर्णय पुणे शहर पोलिसांनी घेतला आहे

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. हा लॉकडाऊन जरी १४ एप्रिल पर्यंत सांगण्यात आला असला तरी तो वाढवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक नागरिक महाराष्ट्रात अडकून पडले आहेत.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून नागरिकांनी जेथे आहे तेथेच राहण्याचे आवाहन जरी केले असले तरी काही लोकांनी हजारो किमीचा पायी प्रवास केल्याचे चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळाले. या लॉकडाऊनमुळे कोणाचे खूप आवश्यक काम जरी असले तरी त्या नागरिकांना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. अशातच आज पुणे पोलिसांनी सोशल मिडीयाच्या आधारे माहिती देत ज्यांना महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करायचा आहे त्यांना योग्य कारण असल्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Coronavirus : पुण्यातील पेठा केल्या ‘सील’

कसा करणार अर्ज:
पुणे पोलिसांनी अति आवश्यक कारणांमुळे परराज्यात प्रवास करावा लागणार असलेल्या नागरिकांसाठी प्रवास करू देण्याची परवानगी दिली आहे. यासाठी नागरिकांना covid19mpass@gmail.com या मेल आयडी वर विनंती अर्ज करण्याचे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे. याशिवाय या विषयी अधिक माहिती हवी असल्यास ०२२- २२०२१६८० या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले आहे. विनंती वाजवी असल्यास परवानगी दिली जाईल असे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांकडून अत्यावश्यक कामासाठी शहरात प्रवास करण्यासाठी डिजिटल पास
परराज्यात प्रवास करू देण्याची पुणे पोलिसांनी आज परवानगी जरी दिली असली तरी याआधीच पुणे शहर अंतर्गत अत्यावश्यक कामामुळे प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांकडून डिजिटल पास देण्यात येत आहे. हा डिजिटल पास मिळवून तो पोलिसांना दाखवल्यास पुणे शहरात प्रवास करता येणार असल्याचे पुणे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कसा मिळणार डिजिटल पास
हा पास मिळविण्यासाठी नागरिकांना punepolice.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या अर्जात नागरिकांना प्रवासासाठी आवश्यक योग्य ते कारण, पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, वाहन क्रमांक, प्रवासासाठी आवश्यक कालावधी, प्रवासाचे ठिकाण, यासंदर्भात अचूक माहिती द्यावी लागणार आहे. या पास संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पुणे पोलिसांनी एक व्हिडिओ सुद्धा तयार केला असून तो व्हिडिओ या संकेतस्थळावर पाहता येईल.

पुणे शहर पोलिसांची पास विषयी महत्वाची सूचना
हा पास घेत असताना दिलेली माहिती जर चुकीची असेल तर पुणे पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पास देत असताना दिलेल्या सूचनांचे पालन करणे नागरिकांसाठी आवश्यक असून जर तसे केले नाही तर पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या लोकांना होम क्वारटाईन करण्यात आले आहे त्यांना हा पास दिला जाणार नसल्याचे सुद्धा पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city police have decided to give permission you can travel other state in lockdown