बारामतीतील 'त्या' 18 जणांचे रिपोर्टस् अद्याप प्रतिक्षेत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 April 2020

- बारामतीत अद्यापही 18 जणांच्या कोरोना चाचणी अहवालाची प्रतिक्षा.

चार ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु

बारामती : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी सात जणांना अधिक तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून, एकूण 18 जणांची तपासणी व त्यांचे रिपोर्ट प्रतिक्षेत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

दुसरीकडे दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी दोघे व दिल्लीहून विमानाने त्याचदिवशी आलेले दोघे अशा चौघांनाही तपासणीसाठी पुण्यात ससून रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

कोरोनाबाधित रिक्षाचालकाच्या संपर्कात आलेल्या अनेकांची यादी प्रशासनाने तयार केलेली असून, बारामतीतील एका रुग्णालयातील सात जणांना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आलेले आहे. त्यांच्या रिपोर्टची प्रतिक्षा प्रशासनाला असून, यातील कुणी जर पॉझिटीव्ह आले तर प्रशासनापुढील अडचणी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

एकूण 22 जण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात अधिक आले होते, त्यापैकी आठ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून, उर्वरित 14 जणांच्या रिपोर्टची अजूनही प्रतिक्षा आहे. प्रशासन हे रिपोर्ट नेमके काय येतात याचीच वाट पाहत आहे. बारामतीत कोरोनाबाधित रुग्ण ज्या भागात राहत होता, तो भाग सील करण्यात आला असून, सर्वतोपरी काळजी घेण्याचे काम केले जात आहे. 

चार ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रयत भवन येथे दोन ठिकाणी, बारामती तालुका दूध संघाच्या वतीने कसब्यातील अक्षता मंगल कार्यालयात तर बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तांदुळवाडी येथे शिवभोजन थाळी उपक्रम सुरु करण्यात आला. 600 जणांच्या थाळीची सोय या निमित्ताने होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reports of 18 peoples still awaited in Baramati