‘डीआरडीओ’कडून सॅनिटायझर सिलिंडर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

  • सिलिंडर क्षमता - ५० लीटर
  • किती मीटरपर्यंतचा परिसर निर्जंतुकरण - ३००० मीटर
  • एकावेळी फवारणी क्षमता - १२ ते १५ मीटर

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ)तर्फे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेअंतर्गत सार्वजनिक जागेच्या निर्जंतुकरणासाठी सॅनिटायझर सिलिंडरची निर्मिती करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत दिल्ली येथील सेंटर फॉर फायर एक्‍सप्लोझिव्ह ॲण्ड एनव्हार्यन्मेंट सेफ्टी यांच्या माध्यमातून दोन सॅनिटायझर उपकरणे तयार करण्यात आली आहेत. इमारतीत अग्निशामक सिलिंडर असतो, तशा प्रकारचे विविध आकारातील सॅनिटायझर सिलिंडर तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फवारणी करण्यासाठी सहजरित्या सिलिंडरला उचलून घेऊन जाण्यासाठी ट्रॉली करण्यात आली आहे.  

या सॅनिटायझर सिलिंडरच्या माध्यमातून हायपोक्‍लोराईडची फवारणी केली जाते. सुमारे ३००० मीटरपर्यंतचा परिसर निर्जंतुकरण करण्यासाठी हवा आणि रासायनिक द्रवाचा वापर करुन फवारणी करण्यात येते. यामध्ये रुग्णालयाचे स्वागतकक्ष, डॉक्‍टरांची केबीन, कार्यालये, मेट्रो, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी जागांवर याचा वापर करणे सोपे आहे.

ट्रॉलीचा वापर करुन हा मोठा सॅनिटायझर सिलिंडर तीन हजार मीटरपर्यंत वापरता येऊ शकतो. या सिलिंडरची द्रवक्षमता ५० लीटर असून, १२ ते १५ मीटरपर्यंत फवारणी जाते. सध्या या सॅनिटायझर सिलिंडरचा वापर दिल्ली पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणांवर सुरू केला आहे. हे सिलिंडर देशातील विविध संस्थांना, रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाऊ शकते. त्यासाठी संस्थांनी व रुग्णालयांनी डीआरडीओशी संपर्क साधावा, असे आवाहन  वैज्ञानिकांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitizer Cylinder by DRDO