हे 'युद्ध' जिंकूच ; ससूनमधील बायोलॉजिकल सोल्जरना विश्‍वास

उमेश शेळके
Thursday, 9 April 2020

सहा रुग्ण ठणठणीत
रुग्णाला विलगीकरण कक्षातून घरी सोडण्याचे निकष आयसीएमआरने निश्‍चित केले आहेत. त्यानुसार १४ दिवसांनंतर रुग्णाचा पहिला स्वॅब तपासण्यासाठी प्रयोगशाळेला पाठवावा लागतो. त्यानंतर पुढील चोवीस तासांमध्ये दुसरा स्वॅब पाठविला जातो. या दोन्ही नमुन्यांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतरच रुग्णाला विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात येते. त्यानंतरही पुढील १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. असे करोनामुक्त झालेल्या ७९ व्यक्ती राज्यात आहेत. त्यामुळे बळींचे प्रमाण सहा टक्के असले तरीही खडखडीत बरे होऊन जाणाऱ्यांचे प्रमाण सुमारे आठ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील युद्धात हा मोठा आशेचा किरण मानला जातो.

पुणे - कोरोनापासून स्वत:चा बचाव... कुटुंबाची काळजी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या ‘त्या’ म्हणजे ‘बायोलॉजिकल सोल्जर’ आहेत. अशा १८ सोल्जर दिवसरात्र ससून रुग्णालयात राहून कोरोनाबाधितांची सेवा करीत आहेत. सध्या त्या ‘रिअल हिरोज’ ठरल्या आहेत.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरात दहा आणि तेरा वर्षांची दोन लहान मुले, ७५ वर्षांची सासू आणि पती. एकीकडे त्यांची चिंता. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या वॉर्डात ड्यूटी. उपचारासाठी त्यांच्याशी येणारा सततचा संपर्क. ससून प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असली, तरीदेखील मनात कायम काळजी असते, असे परिचारिका शीतल चव्हाण सांगत होत्या. गेल्या सात दिवसांपासून घरापासून आम्ही दूर आहोत. अशा अठरा परिचारिका आहेत. त्यांची राहण्याची, खाण्याची सर्व सोय ससूनकडून करण्यात आली आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आम्ही घरी जात नाही. ड्यूटी संपल्यानंतर रूमवर गेल्यानंतरच घरच्यांशी संपर्क होतो, अशा पद्धतीने आमचे दिवसरात्र काम सुरू आहे. संसर्ग झालेल्या रुग्णाचे डाएट, त्यांना द्यावे लागणारे औषधे आणि ऑक्‍सिजन आदी कामे करावी लागतात. संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाकडून आम्हाला पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्‍शन किट) देण्यात आले आहे.

परंतु ड्यूटी संपल्यानंतर पूर्ण सॅनिटाइज होऊन मगच रूमवर जावे लागते. आम्हालादेखील संसर्ग झाला नसल्याची खात्री केली जाते. आम्ही काळजी घेतली नाही, तर आमच्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि इतर कर्मचारी अडचणीत येऊ शकतात, याची जाणीव प्रशासनाला आहे, तशी आम्हालादेखील आहे. आज ही परिस्थिती असली, तरी आम्ही कोरोनाविरोधातील ‘युद्ध जिंकू’. कारण आम्ही आहोत ‘बायोलॉजिकल सोल्जर’ असा विश्‍वासही शीतल यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

साथरोगाच्या पातळ्यांवर एक नजर
कोणत्याही साथीचा उद्रेकाच्या सर्वसाधारण चार पातळ्या असतात. त्यात पहिली पातळी म्हणजे साथीचा उद्रेक झालेल्या एखाद्या भागातून तो रोगजंतू एका माणसाच्या माध्यमातून राज्यात प्रवेश येतो. त्याची बाधा इतरांना झालेली नसते. त्यामुळे ती साथरोगाची पहिली पातळी मानली जाते. दुसऱ्या पातळीत रोगजंतूंचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांमध्ये फैलाव होण्यास सुरुवात होते. महाराष्ट्र आणि देशही साथरोगाच्या दुसऱ्या पातळीवर असल्याचे सांगितले जाते.

तिसऱ्या पातळीत या रोगजंतूंचा संसर्ग समाजात वेगाने पसरला जातो. त्या वेळी त्या साथीचा उद्रेक होतो. परदेशात न गेलेल्या किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्क नसतानाही रोगजंतूंचा संसर्ग या पातळीत होतो. ही पातळी जाहीर करण्याचे निकष निश्‍चित केले आहे. देशातील भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) या पातळ्यांचे विश्‍लेषण करते. चौथ्या पातळीमध्ये रोगजंतूंचा संसर्ग नेमका कोणापासून झाला हे समजण्याच्या पलीकडे स्थिती जाते. त्यात मृत्यूंचे प्रमाण वाढते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sasoon hospital biological soldier confidence It will win the war