Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील पेठांसह शहराचा काही भाग सील

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

शहरातील त्या-त्या भागांत ‘सील’चा प्रयोग यशस्वी करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली आहे. त्यांच्या पातळीवर नियोजन झाले आहे. मात्र, नागरिकांनी जबाबदारीने शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. पुढच्या टप्प्यांत ‘सील’ची अंमलबजावणी कडक करावी लागेल.
- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका

पुणे - कोरोनाला रोखण्यासाठी पेठांसह शहराचा काही भाग मंगळवारी मध्यरात्रीपासून सील करण्यात आला. या भागातील रस्ते पोलिसांनी बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. काही अपवाद वगळता नागरिकांनी घरी बसून प्रतिसाद दिल्याने पहिल्याच दिवशी ‘सील’चा चांगला परिणाम जाणवला. बुधवार (ता.८)पासून याची आणखी काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजपासून काटेकोर अंमलबजावणी
शहरातील जो भाग ‘सील’ केला आहे; त्या ठिकाणी पोलिसांसह बॅरिकेड लावून रस्ते रोखले जाणार आहेत. त्याचवेळी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येईल. त्याबाबत पोलिसांशी चर्चा झाल्याचे ‘सील’चा परिसर बुधवारपासून (ता. ८) निर्मनुष्य राहील, असे 
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोनाचे अधिक रुग्ण सापडल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व पेठांसह काही भाग महापालिकेने ‘सील’ केला असून, त्यामुळे या भागांत लोकांची ये-जा राहणार नसल्याचे सोमवारी (ता. ६) सांगितले होते. मात्र, हा निर्णय चार-पाच तास आधी जाहीर झाल्याने नागरिक गोंधळले.

पोलिसांसोबत वाद
वेगवेगळ्या भागांत सकाळी नागरिक रस्त्यांवर दिसले तरी, दुपारनंतर पोलिसांनी नागरिकांना हुसकावून लावले. भवानी पेठेतील एका किराणा दुकानात गर्दी झाल्याने दुकान बंद करण्यासोबतच पोलिसांनी नागरिकांना घरी जाण्यास सांगितले. त्यावरून व्यावसायिक आणि पोलिसांत वादही झाला. तेव्हाच, दुपारी गल्लीबोळात एकत्र बसलेल्या तरुणांना पोलिस शिक्षा करीत होते. 

बॅरिकेडची कमतरता
सील केलेल्या भागांतील वाहतुकीचे ‘इन-आउट’ मार्ग बंद केले जाणार असल्याचेही महापालिकेने सांगितले. मात्र, त्यासाठी पुरेसे बॅरिकेड नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे जिथे शक्‍य आहे; तिथे बॅरिकेड आणि अन्य रस्त्यांवर दोरीचा वापर करण्यात येत आहे, असे विविध मार्गांवरील पोलिस सांगत होते. परंतु, पोलिसांची नजर चुकवून लोक रस्त्यावर येत असल्याचेही दिसून आले.

पुरेसा किराणा उपलब्ध
या परिस्थितीतही किराणा दुकाने, मेडिकल आणि मंडईत पुरेशा प्रमाणात साहित्य उपलब्ध राहणार आहे. ‘सील’ असले तरी, अत्यावश्‍यक सेवेतील घटकांना माल पुरविण्याची मुभा आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू कमी पडणार नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत सील कायम राहणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seals will be part of the pune city to prevent corona