Coronavirus : बारामतीत कोरोनाबाधित रुग्णाच्या सात नातेवाईकांचीही होणार तपासणी

मिलिंद संगई
Monday, 30 March 2020

बारामती शहरात काल एका रिक्षाचालकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्या सात नातेवाईकांनाही पुढील तपासणीसाठी पुण्याला नेण्यात आले आहे, अशी माहिती सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.

बारामती - शहरात काल एका रिक्षाचालकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्या सात नातेवाईकांनाही पुढील तपासणीसाठी पुण्याला नेण्यात आले आहे, अशी माहिती सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान बारामतीत कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी बारामतीला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. 

ज्या रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाली आहे त्याची पत्नी, मुले तसेच मेव्हणा यांचीही आता तपासणी होणार आहे. त्यांचे रिपोर्टस अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. 

डॉक्टरांवर आली संक्रांत
दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्ण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काही डॉक्टरांच्या संपर्कात आलेला असल्याने बारामतीतील पाच डॉक्टरांनाही नाईलाजाने होन कोरोटांईन व्हावे लागले आहे. काही डॉक्टरांना आपली रुग्णालयेही बंद ठेवावी लागत असून डॉक्टरच होम कोरोंटाईन असल्याने आता हळुहळू वैद्यकीय सेवेवरही याचा परिणाम जाणवणार आहे. 

वेगाने तपासणी सुरु
बारामतीतील ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे त्या तीन कि.मी. परिसरातील प्रत्येक कुटुंबात जाऊन त्यांची तपासणी व वैद्यकीय इतिहास जाणून घेतला जात आहे. 110 कर्मचारी हे काम करीत आहेत. इतर कोणाला अशी लक्षणे आढळत असल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात तपासणीसाठी नेले जाणार आहे. 
अनेकांना व्हावे लागले होम कोरोटांईन....

कोरोनाबाधित रुग्ण संपर्कात आला अशा जवळपास 30 जणांना प्रशासनाने तपासणीनंतर होम कोरोटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही तो किती जणांच्या संपर्कात आला होता त्याचा शोध सुरु आहे. जे नागरिक संबंधित रुग्णाच्या संपर्कात आले असतील त्यांनी तपासणी करुन स्वताःला 14 दिवसांसाठी होम कोरोटांईन करण्याची गरज असल्याचे डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले. 

राज्य राखीव दल रस्त्यावर
दरम्यान लोकांनी घराबाहेर पडू नये हे अनेक जण अजूनही ऐकत नसल्याने आज पोलिसांच्या मदतीला बारामतीत राज्य राखीव दलाचे पोलिसही रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काल जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार बारामतीतील लॉकडाऊनचे ड्रोनने चित्रीकरणही केले गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven relatives of coronavirus patient will also be examined in Baramati