त्यांना फक्त पोटापुरता पसा पहिजे.... 

सुनील माळी : सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

कोरोनाची झपाट्याने लागण होत असलेल्या पुण्यातील पेठांच्या भागाचे.त्यामुळेच रेशनवरील पाच किलो तांदूळ मिळविण्यासाठी त्यांच्या रांगा लागताहेत,‘सोशल डिस्टन्सिंग’चा प्रयत्न करूनही प्रत्यक्षात ते जमत नाहीये.

पुणे - काही लाख जणांची दाटीवाटीनं असलेली घरं, आठ बाय दहाच्या घरात राहणारी सहा-सहा माणसं अन हातावर पोट असलेल्या बहुसंख्य जणांना गेले सत्तावीस दिवस करावा लागलेला संचारबंदीचा सामना... हे चित्र आहे कोरोनाची झपाट्याने लागण होत असलेल्या पुण्यातील पेठांच्या भागाचे. त्यामुळेच रेशनवरील पाच किलो तांदूळ मिळविण्यासाठी त्यांच्या रांगा लागताहेत, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा प्रयत्न करूनही प्रत्यक्षात ते जमत नाहीये... 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पेठांच्या भागात कोरोनाची लागण वेगाने होत असल्याने प्रशासन आणि पुणेकरही चिंताक्रांत आहेत. या पेठांसह कोंढवा-सहकारनगरपर्यंतचा भाग रेड झोनमध्ये दाखवून तो सील करण्यात आला आहे. तरीही तेथील विषाणूची लागण का कमी होत नाही, या प्रश्‍नाचे उत्तर मिळविण्यासाठी या भागांतील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संपर्क साधला असता त्याची कारणे समोर आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पेठांच्या भागामधील लोकसंख्येची घनता दाट आहे. भवानी पेठ, गुरूवार पेठ, रास्ता पेठ, महात्मा फुले पेठ, नाना पेठ आदी भागांमध्ये दाटीवाटीने लोक राहतात. अंगारशा तकिया, चमडे गल्ली, राजेवाडी, पत्र्याची चाळ या भागामध्ये तर रस्ते म्हणजे छोट्या गल्ल्या आहेत. एखाद्या लहानशा ‘घरात’ म्हणजे छोट्याशा दीड-दोन खोल्यांमध्येही पोटमाळे आहेत. खालच्या भागात चार ते सहा जण आणि पोटमाळ्यावरही तेवढेच जण राहत असतात. त्यांना एकमेकांपासून लांब राहणे केवळ अशक्‍य असते. एकमेकांशी संपर्क येणे अपरिहार्य असल्याने संसर्गाचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

पेठांमधील बहुसंख्य जण हातावर पोट असलेले आहेत. गेले सत्तावीस दिवस ते रोजगारापासून लांब आहेत. खायची भ्रांत असलेल्या या रहिवाशांसाठी काही सामाजिक-धार्मिक संस्था अन्न पुरवत असल्या तरी ती मदत अपुरी आहे. त्यात रेशनवर पाच किलो तांदूळ, गहू मिळणार असल्याचे जाहीर झाल्याने या भागात रेशन दुकानांसमोर लांबचलांब रांगा दिसून आल्या. 

‘शेवटी भूक थांबत नाही ना...’ एका रहिवाशाने आपली व्यथा या शब्दांत व्यक्त केली. एका मध्यमवयीन व्यक्तीची गुजराण हातगाडीवर गोळ्या विकून होते. त्यात त्याला आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावे लागते. त्याच्यासारखे साठ हजार जण हातगाडीवर माल विकून पोट भरतात. मोटारी पुसून गुजराण करणारी सुमारे पाच हजार मुले पुण्यात आहेत. त्यातली अनेक मुले या रेडझोनमध्ये राहतात. अशा कुटुंबांना संचारबंदीच्या काळात घरपोच अन्न मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होते. मजुरांना राहण्याची व्यवस्था सावित्रीबाई फुले प्रशालेत, लहुजी वस्ताद शाळेत तसेच अन्यत्र करण्यात आली असली तरी गरजेच्या मानाने ती अपुरी पडते. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी या वर्गाच्या रोजच्या खाण्याची व्यवस्था होण्याची मागणीही होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social distance is not follow in Petha