Coronavirus:विलगीकरणासाठी आता "विशेष तंबू'; आयुध निर्माण बोर्डाच्या कानपूरमधील कारखान्यात निर्मिती

अक्षता पवार : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 7 April 2020

आयुध निर्माण बोर्डाच्या (ओएफबी) कानपूर येथील कारखान्यामध्ये विशेष तंबूंची निर्मिती केली जात असून, त्यांचा वापर रुग्णालयांतर्फे विलगीकरणासाठी केला जात आहे.

पुणे -  देशात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वैद्यकीय साधनांबरोबरच विलगीकरण कक्षांची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आयुध निर्माण बोर्डाच्या (ओएफबी) कानपूर येथील कारखान्यामध्ये विशेष तंबूंची निर्मिती केली जात असून, त्यांचा वापर रुग्णालयांतर्फे विलगीकरणासाठी केला जात आहे. तसेच, राज्य आणि वैद्यकीय प्रशासनाला हे तंबू कमी किमतीत उपलब्ध करून दिले जात आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कानपूर येथील आयुध कारखान्यात दररोज सुमारे 30 विशेष तंबूंची निर्मिती होत आहे. या तंबूमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांसाठी सर्व सुविधा आहेत. तसेच, एक तंबूमध्ये दोन बेडची सुविधा देण्यात आली आहे. सामान्य तंबूंच्या तुलनेत हे कमी वजनाचे असल्यामुळे सहजपणे हलवता येतात. सध्या अरुणाचल प्रदेशामधल्या रुग्णांसाठी अशा पन्नास तंबूंचा पुरवठा करण्यात आला असून, सध्या आणखी पाच राज्यांनी यासाठी मागणी केली असल्याची माहिती "ओएफबी'च्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली. सध्याची परिस्थिती पाहता या तंबूंचे उत्पादन वाढविण्यासाठी कानपूरसोबत चेन्नईमधील अवादी येथे असलेल्या आयुध कारखान्याची मदत घेतली जाणार आहे. 

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव

विशेष तंबूचे वैशिष्ट्य 
- तंबू जलरोधक (वॉटरप्रूफ) असल्याने पावसाळ्यात काळजी नाही 
- वैद्यकीय यंत्रणे व संसाधनांनी सज्ज 
- एका तंबूत दोन बेडची सोय 
- माईल्ड स्टील व ऍल्युमिनियमचा वापर 
- वजन सुमारे 10 किलो 
- व्हेंटिलेशनसाठी विशेष काळजी 

"ओएफबी'कडून सध्या मोठ्या प्रमाणावर इतर वैद्यकीय संसाधनांची निर्मिती केली जात आहे. तसेच, राज्य प्रशासन किंवा इतर रुग्णालयांच्या मागणीनुसार त्यांना या वस्तू पुरविण्यात येत आहेत. या संसाधनांच्या किमती 20 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आल्या आल्या आहेत. त्यामुळे या सुविधा घेण्यास रुग्णालयांना अडचण येणार नाही. 
- उद्दीन मुखर्जी, सहसंचालक ओएफबी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special tent for separation Manufacturing at the factory in Kanpur of the Ordnance Generation Board