coronavirus: सुरक्षित राहून डॉक्‍टरांवरचा ताण कमी करा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

विनाकारण लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडताय. क्षणभर थांबा.तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्या जिवाला तर धोका आहेच.पण, डॉक्‍टरांवरील ताण वाढणार आणि त्यांच्याही जिवाचा धोका वाढणार.याचा विचार करून तुम्ही घरातच बसा

पुणे - विनाकारण लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडताय. क्षणभर थांबा. तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्या जिवाला तर धोका आहेच. पण, डॉक्‍टरांवरील ताण वाढणार आणि त्यांच्याही जिवाचा धोका वाढणार. सध्याच्या काळात डॉक्‍टर जिवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यांनाही कुटुंब आहे, याचा विचार करून तुम्ही घरातच बसा. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे. हवेतूनही हा अत्यंत सूक्ष्मजीव सहज दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातो. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या  डॉक्‍टरांना स्वतःच्या संरक्षणासाठी पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट कीट (पीपीई) घालावे लागते. त्याची गुणवत्ता निर्विवाद सर्वोत्कृष्ट असणे हे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टर आणि शुश्रूषा करणाऱ्या परिचारिका यांच्यासाठी पीपीई कीट अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातून हवादेखील आतमध्ये जाणार नाही, याची काळजी प्रकर्षाने घेतली जाते. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एकदा कोरोनाच्या वॉर्डमध्ये उपचारासाठी गेलेले डॉक्‍टर किमान चार तास आतमध्ये असतात. तेथे खाणं-पिणं तर दूरच पण चार-चार तास स्वच्छतागृहातही जाता येत नाही. अशा प्रचंड गुदमरणाऱ्या पीपीई किटमध्ये हे डॉक्‍टर कोविडच्या वॉर्डमध्ये असतात. अशा स्थितीत ते रुग्णांची सेवा करतात. एखाद्या बंदिस्त चेंबरमध्ये ठेवल्याप्रमाणे डॉक्‍टरांना चार-चार तास राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी आपण सर्वांनी घरीच थांबणे, ही आता काळाची गरज असल्याचे आवाहन, "इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन'चे (आयएससीसीएम) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कपिल झिरपे यांनी केले आहे. 

भारतात पीपीई किटचा तुटवडा आहे. त्यामुळे प्रत्येक तासाला पीपीई कीट बदलणे डॉक्‍टर, रुग्णालय आणि सरकारलाही परवडणारे नाही. त्यामुळे एक डॉक्‍टर किमान चार तास तो सूट घालून रुग्णसेवा करत असतो. त्यानंतर चार तासांची विश्रांती घेतो आणि पुन्हा चार तास रुग्णसेवेसाठी सज्ज होतो. एका पीपीई किटची बाजारातील किंमत दीड ते दोन हजार रुपये आहे. एकदा घातलेले पीपीई कीट परत वापरता येत नाही. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. अशा स्थितीत 12 तासांमध्ये आठ तास ड्यूटी केली जाते. 

पीपीई किटची वैशिष्ट्ये 
- हवादेखील आत जात नाही 
- श्‍वास घेण्यासाठी एन 95 मास्क वापरला जातो. 
- मास्कमधून हवा गाळून आत जाते. 
- हा सूट घालण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात. 
- तो काढण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. 

पीपीई किटची सद्यःस्थिती 
-देशात उपलब्ध पीपीई किटची संख्या - 3 लाख 87 हजार 
-चीनकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या किटची संख्या- 1 लाख 70 हजार 
-देशांतर्गत उत्पादन केलेली संख्या - 20 हजार 
-आतापर्यंत वाटप झालेली संख्या- 2 लाख 94 हजार 
-सिंगापूर येथील कंपनीला दिलेली ऑर्डर - 80 लाख 
-चीनमधील कंपनीला ऑर्डर देण्यात येणाऱ्या किटची संख्या- 60 लाख 

"देशाच्या सीमेचे संरक्षण करणारा जवान आणि रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः चार-चार तास गुदमरत रुग्णसेवा करणारा डॉक्‍टर हे दोन्ही आता देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच सुरक्षित बसावे. '' 
- डॉ. कपिल झिरपे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, आयएससीसीएम. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stay safe and reduce stress on doctors in lockdown