Coronavirus : पुण्यात झोपडपट्टीतील तिघांचा मृत्यू; कोरोना संसर्गाचे कारण अनिश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे अवघ्या चोवीस तासांत पुण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. 

पुणे - कोरोनाच्या संसर्गामुळे अवघ्या चोवीस तासांत पुण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, नवीन 11 जणांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुलटेकडी येथील डायस प्लॉंट परिसरातील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या 30 मार्चला एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. दुसऱया रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांना दम लागायला सुरुवात झाली. त्यामुळे 1 एप्रिलला त्यांचा स्वॅब तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला आलेल्या प्रयोगशाळा अहवालात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयातून त्यांना विलगीकरणासाठी महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, नायडू रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णावर उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात 2 एप्रिलला रात्री हलविण्यात आले. दाखल केल्यापासूनच त्या अत्यवस्थ होत्या. वय, शस्त्रक्रिया, सेप्सिस हे उपचारातील मोठे अडथळे होते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाबरोबरच असलेल्या या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

भवानी पेठेतील कासेवाडी भागात रहाणाऱया 52 वर्षांच्या पुरुषाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लक्षणे दिसल्याने हा रुग्ण ससून रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी आला होता. त्यांना उच्चरक्तदाब आणि मधुमेह हे विकार होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात रहाणाऱ्या 60 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला. त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतरही त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे शनिवारी (ता. 4) ससून रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. 

अकरा रुग्ण पॉझिटीव्ह 
शहरात गेल्या चोवीस तासांत अकरा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान आहे. त्यापैकी तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 69 रुग्णांना संसर्ग झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी 61 रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, उर्वरित आठ शहराच्या बाहेरील आहेत. या 69 पैकी 15 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले आहे. 

खासगी रुग्णालयांवरील भार वाढला 
आतापर्यंत महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार होत होते. मात्र, शंभर खाटांचे हे रुग्णालय आता भरत आले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येत आहे. सद्यःस्थितीत नऊ खासगी रुग्णालयांमधून 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three persons dies from corona in Pune slum area