Coronavirus : वायसीएममध्ये फक्त पाॅझिटीव्ह व संशयितांवर उपचार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

कोरोना बाधितांवर शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेचे कार्यरत आहे. त्या अनुषंगाने सध्याच्या घडीला इतर रुग्णांवरही उपचार करणे तितकेच गरजेचे आहे. रुग्णांचे आरोग्यहित पाहता त्यांना सर्वोतोपरी उपचार देण्यास आमचे रुग्णालय कटिबद्ध आहे.
- डॉ. पी. डी. पाटील, कुलपती‌, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ.

पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय  व संशोधन केंद्र आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे केवळ कोरोना बाधित रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करणार आहे. तर, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले की, सध्या कोरोना बाधितांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर रुग्णांच्या उपचारांबाबत निर्णय घेणे फार महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने डॉ. डी. वाय. पाटील विद्यपीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्याशी संवाद साधला.  त्यांनी सहमती दिल्याने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात इतर आजारावरील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

'यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाशी झालेल्या सामंजस्य करारानुसार नॉन कोविड रुग्णांची आम्ही काळजी घेण्यास सक्षम आहोत. कोविड व नॉन कोविड रुग्णांची वेगवेगळी व्यवस्था केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येईल,'' असे मत डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment of Positives and Suspects in YCM Only