कोरोनावर आता ‘आयुष’ औषधांची मात्रा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

कोरोना विषाणूंचा उद्रेक जगभरात झाला आहे. आयुष अंतर्गत इतर शास्त्रांद्वारे कोरोनाच्या रुग्णांवर संशोधनात्मक उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे परिपत्रक मंत्रालयाने प्रसिद्ध केले.

पुणे - कोरोना विषाणूंचा धोका असणारे तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर करता येईल. त्यासाठी क्लिनिकल ट्रायल (माणसांवरील तपासणी) करायला परवानगी देण्याचा निर्णय आयुर्वेद, योगशास्त्र, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालयाने मंगळवारी घेतला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूंचा उद्रेक जगभरात झाला आहे. यावर अद्यापपर्यंत कोणतेही औषध नाही. त्यामुळे पारंपरिक औषधांचा वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर हजारो वर्षांचा वैद्यकीय वारसा असेलल्या आयुर्वेद व योगाला तसेच आयुष अंतर्गत इतर शास्त्रांद्वारे कोरोनाच्या रुग्णांवर संशोधनात्मक उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे परिपत्रक मंत्रालयाने प्रसिद्ध केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींमध्ये अशा साथीचे आजार नियंत्रित करण्याची प्रभावी औषधे आहेत. त्याचा मोठा वारसा या उपचार पद्धतीला मिळाला आहे. त्यामुळे त्याचा वापर देशातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय सहसचिव पी. एन. रणजित कुमार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. 

आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशा उपचार पद्धतींमधील औषध निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक क्लिनिकल ट्रायल घेण्याबाबत औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा १९४५ मध्ये निश्‍चित तरतूद केलेली नाही. पण, त्याच वेळी विश्वासार्ह आणि शास्त्रीय आधारावरील वैद्यकीय माहिती असणे महत्त्वाची आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयाने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (सीडीएससीओ) यांच्यासह इतर संशोधनक्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याचे यात स्पष्ट केले आहे. 

आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी म्हणाले, “कोरोनासाठी कोणतेच उपचार नाहीत. अशा वेळी लक्षणांच्या आधारावर आयुर्वेदाने लाक्षणकी चिकित्सा सांगितली आहे. ही चिकित्सा कोरोनावर किती उपयुक्त ठरते, हे संशोधनाशिवाय सिद्ध होऊ शकणार नाही. या परिपत्राकामुळे या क्षेत्रात संशोधन करणे शक्य होणार आहे. त्यातून नजीकच्या भविष्यात कोरोनावर प्रभावी औषध निर्माण करता येईल. यात प्रयोगशाळा, लस, औषधांची क्षमता वाढविण्यासाठी, विषाणूंचा प्रदूर्भावामुळे शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल. 

आयुर्वेदाच्या संशोधनाला यात खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी त्यातून खोटे दावे होणार नाही, याची कळजी घेण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, “या परिपत्रकातून आयुर्वेदिक वैद्य, कंपन्या, संशोधक यांना संशोधनाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांना पुढे येऊन शास्त्रशुद्ध कसोटीवर आयुर्वेदाचे सामर्थ्य जगाला दाखविण्याची संधी मिळाली आहे. लोकांनी आजारीच पडू नये, याला आयुर्वेदशास्त्र प्राधान्य देते. आज कोरोनाचे आक्रमण झाले असले तरीही भविष्यात अशा प्रकारे न दिणाऱ्या रोगजंतूंच्या उद्रेकात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आयुर्वेदिक तत्त्वे उपयुक्त ठरू शकतील. 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, झाला तरी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याइतपत प्रकृतीत बिघाड होऊ नये, तो रुग्णालयात गेला तरीही तो अत्यवस्थ होऊन व्हेंटिलेटरवर जाऊ नये या गोष्टी टाळण्याकरिता आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. क्लिनिकल ट्रायलमधून या गोष्टी जगापुढे सप्रमाणित येणे आवश्यक आहे. 
- वैद्य योगेश बेंडाळे, आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक वैद्य व संशोधक 

होणार काय? 

- कोरोना रुग्णांवर ‘आयुष’ डॉक्टरांना उपचार शक्य 
- कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्यांना प्रतिबंधात्मक औषधे देणे शक्य 
- भविष्यातील वापरासाठी पुराव्याधारित औषधपचार शक्य 
- प्रयोगशाळेतील आणि प्रत्यक्ष माणसांवरही ‘आयुष’ औषधांच्या चाचण्या शक्य 
- आयुर्वेदाची उपयुक्तता शास्त्रीय माहितीच्या आधारे जगासमोर मांडणे शक्य 
- आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशा उपचार पद्धतींद्वारे कोरोनावरील उपचारांसाठी संशोधन शक्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatments on corona patients through other disciplines under ayush