
तळेगाव दाभाडे - ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी मावळ तालुका आरोग्य विभाग सक्रिय झाला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय शीघ्र प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे. लोणावळा, तळेगाव व वडगावमध्ये परदेशातून आलेल्या वीस जणांना घरातच विलगीकरण कक्षात ठेवून काळजी घेण्यात येत आहे. एकाला नायडू रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून, अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयित आढळल्यास संपर्क करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी केले आहे.
तालुका आरोग्य विभाग, नगर परिषद व ग्रामपंचायत प्रशासन कार्यरत झाल्या आहेत. कान्हे-फाटा व पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयांत विलगीकरण कक्ष स्थापन केले असून, वीस जणांवर उपचाराची व्यवस्था वीस जणांना विलगीकरण कक्षात उपचार करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय शीघ्र प्रतिसाद पथके स्थापन करण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयातील डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, सरपंच, आरोग्य कर्मचारी आदींना पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे डॉ. लोहारे यांनी सांगितले. कोरोनासंदर्भात काळजी घेण्यासाठी फलक व माहिती पत्रक नागरिकांना देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनेटायझर व माक्स देण्यात येणार आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून वास्तव्यास येणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती मागविण्यात येत असून, आवश्यक असणाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवून संबंधितांवर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सध्या परदेशातून आलेल्यांपैकी लोणावळा येथे दहा, वडगावात दोन तर तळेगावात आठ असे वीस जणांना संबंधितांचे घरीच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणासाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पुढील चौदा दिवस त्यांच्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत देखरेख करण्यात येणार आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, काळजी करण्याचे कारण नाही.
मावळात आठवडे बाजार बंद
वडगाव मावळ - मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व महाविद्यालये व शाळा मंगळवारपासून बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण दिसून आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय कार्यालयांमधील नागरिकांची गर्दीही कमी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या शहरंत भरणारे आठवडे बाजारही रद्द केले आहेत. वडगावात बुधवारी व गुरुवारी भरणारा आठवडे बाजारही रद्द करण्यात आला आहे. राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमही रद्द केले आहेत.
पथकाची नेमणूक
सरकारने मास्क व सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत अंतर्भाव केला असून, त्यांचा काळाबाजार व अवैधरीत्या विक्री रोखण्यासाठी पथक नेमले असल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. नागरिकांनी अधिक माहितीसाठी ८९७५५९९५००, ९८२२९३६७९९, ९६७२२१६४० अथवा ९४२३९०६८०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
कामशेतला विक्रेत्यांना ताकीद
कामशेत - येथील आठवडे बाजारात माल घेऊन विक्रीसाठी आलेल्या चारशेपेक्षा जास्त विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली. पुढील आठवड्यात बाजारात आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले. तसेच, बंद ठेवण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रताप माने यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.