Coronavirus : मार्केट यार्ड बंद असल्याने भावामध्ये वाढ; भाजी खरेदीसाठी कसरत

Vegetable
Vegetable

पुणे - गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्या अनुषंगाने उपनगरांतील भाजीपाला विक्रीची सद्यस्थिती काय आहे, याचा घेतलेला आढावा.

मुंढवा-केशवनगरमध्ये विक्री बंद
मुंढवा -
 केशवनगर मुंढवा परिसरात तीन दिवस जनता कर्फ्यू लागू असल्याने, भाजीपाला विक्रीची दुकाने बंद ठेवली आहे. त्याचे नियोजन नागरिकांनी अगोदरच केल्याचे सांगितले. मार्केट यार्ड, मांजरी, हडपसर व चंदननगर परिसरातून भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. खराडी-चंदननगरमध्येही तीन दिवस जनता कर्फ्यू लागू आहे.

भवानी पेठेत  झुंबड 
कँटोन्मेंट -
 शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळून आले आहे. त्याच परिसरात आज मोठ्या प्रमाणात भाजी घेण्यासाठी नागरिकांची एकच  झूबंड उडालेली दिसून येते. यावेळी मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

घोरपडीत नागरिकांची गैरसोय
घोरपडी -
 गावामध्ये कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्यामुळे घोरपडी गावठाण आणि परिसर संपूर्णपणे सील करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील भाजी मंडई आणि रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे घोरपडी परिसरात भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून नागरिकांना भाजीपाल्यासाठी कसरत करावी लागत आहे.

गोखलेनगरला शेतकऱ्यांना विरोध
गोखलेनगर -
 जनवाडी ते कुसाळकर चौकात भाजी व्यवसाय चालतो. येथे शेतकऱ्यांना थेट विक्री करण्यास स्थानिक भाजीवाल्यांचा पूर्वींपासून विरोध आहे, त्यामुळे येथे शेतकरी येत नाही. परिसरातील मोठ्या लोकसंख्येमुळे भाजीपाल्याची मागणी जास्त आहे. फळ खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

उत्तमनगर भागात  मुबलक साठा 
वारजे माळवाडी -
 शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे व कोंढवे धावडे या भागात भाजीपाला खरेदीसाठी पोलिसांनी वेळ वाढविली आहे.  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उत्तमनगरला उपबाजार आहे, तसेच शेतकऱ्यांकडून  टेम्पोतून भाजी, फळे विक्रीला येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत नाही. रस्ते रिकामे असल्याने   सामाजिक अंतर ठेवून खरेदी-विक्री होते.

औंधमध्ये शेतकऱ्यांकडून विक्री
औंध -
 पाषाण, सूसरस्ता, बोपोडी, औंध, रोहन निलय सोसायटी परिसर, सांगवी रस्ता परिसरात व्यवस्थित व ठरावीक वेळेतच भाजी विक्री केली जात आहे. विक्रेत्यांकडे आज भाजीसाठा असला, तरी दोन दिवसांत तो कमी झाल्यानंतर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. महाळुंगे, सूस येथील शेतकऱ्यांकडून भाजीपाला विक्रीला येत असतो, पण त्याची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता आहे. 

आंबेगावात फळभाज्यांना मागणी
आंबेगाव -
 बारामती व वाई येथून भाजीपाला विक्रीसाठी बाजारात येत आहे, तसेच शेतकरीही थेट विक्री करतात.  कांदा, बटाटा, फ्लॉवर, टोमॅटोसारख्या मालाला जास्त मागणी आहे. त्यामुळे हा माल सहजपणे विक्री होतो, पण अन्य भाज्यांची विक्री न झाल्याने खराब झालेला माल फेकून द्यावा लागत आहे.

सोसायट्यांत विक्रीची व्यवस्था
खडकवासला -
 गोऱ्हे, डोणजे, खानापूर, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला परिसरात स्थानिक शेतकरी, टेम्पोतून माल घेऊन येणारे विक्रेते यांच्यामुळे भाजी मिळते. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये कृषी विभागाने भाजी विक्रीची व्यवस्था केली आहे. फळे, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

बाणेर, बालेवाडीत किमतीत वाढ
बालेवाडी -
 बाणेर, बालेवाडी परिसरात अनेक सोसायटयांमध्ये, शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळांची विक्री सुरू आहे. आठवड्यातून दोन वेळा विक्रीसाठी भाजी आणि फळे आणली जातात. मात्र जे भाजीपाला विक्रेते गुलटेकडीला भाजी खरेदी करत होते, त्यांना शेतकऱ्यांकडून जागेवर माल पोचवला जात आहे. त्यांना वाहतूक खर्च द्यावा लागल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे, तसेच बालेवाडीतील काही शेतकरी शेतातील मालाची विक्री करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com