जागा निश्‍चित, तरीही हातगाड्या रस्त्यांवर

सुवर्णा नवले
Sunday, 19 April 2020

- कासारवाडीत सितांगण उद्यान येथे भाजी विक्री

- भाजीविक्रेत्यांना दंडुक्‍याचेच शहाणपण

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 46 ठिकाणी शहरभरात नियोजनबद्ध जागा निश्‍चित करून दिल्या. तरीही पोलिस व महापालिका प्रशासनाच्या वरचढ भाजीविक्रेते असल्याचे चित्र शहरभर आहे. रोज पोलिसांना हातात दंडुका घेऊन या भाजी विक्रेत्यांना शहाणपणाचे डोस पाजावे लागत आहेत. या भाजीविक्रेत्यांवर दंडुका तरी किती दिवस चालणार? असा प्रश्‍न उभा राहत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये भाजी विक्रेत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच गर्दी वाढविण्यामध्येही भाजी विक्रेते पुढे आहेत. हातावरचे पोट असले तरी या भाजीविक्रेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही. त्यासाठी महापालिकेने शहरभरातील अधिकृत भाजी विक्रेत्यांना पासचे वाटप केले. मात्र, यामध्ये बऱ्याच हातगाडी चालकांचा देखील समावेश आहे. ज्यांना पास मिळालेले नाहीत. ते दारोदार फिरून भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे अनधिकृत भाजीविक्रेते सर्रास रस्त्यावर मुक्त संचार करत आहेत. तूर्तास तरी या सर्वच भाजीविक्रेत्यांना महापालिकेने भाजी व्रिकीसाठी परवानगी दिलेली आहे.

आखणी तरीही गर्दी

भाजीविक्रेत्यांचा निष्काळजीपणा अद्यापही सुरूच आहे. तोंडाला मास्क न बांधता भाजी विक्री होत आहे. सोसायट्यांमध्ये भाजीविक्रेत्यांचा मुक्त वावर सुरू आहे. सुशिक्षित नागरिकही कोणती दक्षता न घेता भाजी खरेदी करण्यासाठी तुटून पडत आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच सर्रास गल्लीबोळात हातगाडीवर भाजी विक्री सुरू आहे.

पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज कानावर पडताच भाजी विक्रेते धूम ठोकत आहेत. सर्व भाजी विक्रेत्यांना भाजीसाठी ठरावीक अंतरावर आखणी करून देऊनही भाजी विक्रेते गर्दी करून सर्वांचा जीव धोक्‍यात घालीत आहेत. याशिवाय सर्व भाजी विक्रेत्यांना जागा सॅनिटाइज व आखणी करून देण्यात आलेल्या आहेत.

कासारवाडीत सितांगण उद्यान येथे भाजी विक्री

पिंपरी-चिंचवड शहरासह कासारवाडी, पिंपळेगुरव, सांगवी या भागात हे नित्याचे दृश्‍य आहे. ज्या भागात भाजी विक्रीसाठी लांब पायपीट करावी लागत होती. त्यांना देखील जवळच्या ठिकाणी सुसज्ज जागा निश्‍चित करून दिल्या आहेत. कासारवाडीतील सिंतागण उद्यान येथे भाजी विक्री सुरु करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables Seller not selling Vegetables on Fixed Spot