Coronavirus : कलावंत काय करताहेत..

नीला शर्मा
रविवार, 22 मार्च 2020

‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कलावंतांनी घरीच राहणे ठरवले आहे. ते या वेळेचा उपयोग कलासाधना, कुटुंबीय व राहून गेलेल्या काही उपक्रमांसाठी कल्पकतेने करून घेत आहेत.

'कोरोना’ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कलावंतांनी घरीच राहणे ठरवले आहे. ते या वेळेचा उपयोग कलासाधना, कुटुंबीय व राहून गेलेल्या काही उपक्रमांसाठी कल्पकतेने करून घेत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावनी शेंडे - साठ्ये (शास्त्रीय गायिका) : आताचा प्रसंग आणीबाणीचा असला तरी यातून सकारात्मक पावलं टाकायची संधी हेरावी. एरवी फारसे गायले न जाणारे राग नीट बसवायचे बरेच दिवस ठरवत होते. आता मोहिनी, अमृतवर्षिणी, अमरप्रिया, साजन या रागांचा रियाझ त्या दृष्टीने करते आहे. कुटुंब आणि शिष्यांना पुरेसा वेळ देता न आल्याची सुखद भरपाई आता करते आहे.

राहुल देशपांडे (गायक) : भरपूर वेळ बसून रियाझाची भूक या कालावधीत भागवतो आहे. घरातले सगळे आणि विशेषतः माझ्या मुलीबरोबर मनमुराद वेळ घालवायला मिळतो आहे. एकीकडे पत्ते, कॅरम, गप्पा वगैरेची मौज अनुभवत दुसरीकडे माझे आजोबा वसंतराव देशपांडे तसंच गायक कुमार गंधर्व यांच्या गाण्याची ध्वनिमुद्रणं मन लावून ऐकतो आहे. मध्यंतरी फेसबुक लाइव्ह केलं. 

सलील कुलकर्णी (गायक-संगीतकार) : माझं काम आणि मुलं हेच माझं सर्वस्व. मी तसा घरात आणि घरातल्यांसोबत रमणारा. त्यामुळे आत्ता भरपूर दिवस घरात राहायला मिळणं ही वाइटातून घडलेली चांगली गोष्ट. माझा मुलगा शुभंकर आणि मी एकाच वेळी घरात असल्याचा फायदा करून घेत त्याला गाणं शिकवतो आहे. कुटुंबीय एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत आहोत. 

अरुंधती पटवर्धन (नृत्यांगना) : अनेक प्रकल्प सलग वेळेअभावी बाजूला पडत होते. त्यांपैकी भरतनाट्यम्‌ या नृत्यप्रकारातील आईकडून (डॉ. सुचेता चापेकर) मिळालेल्या शास्त्रीय माहितीचं डॉक्‍युमेंटेशन, नोटेशन, संबंधित लेखन यांवर माझा आणि ‘कलावर्धिनी’ संस्थेतील सर्व सहयोगींचा सध्या भर आहे. आपल्या घरून आम्ही हे सारं निगुतीने करतो आहोत. माझे यजमान मर्चंट नेव्हीत आहेत. सध्या ते घरी आल्यामुळे ही सुटी वेगळी ठरते आहे.  

वैभव जोशी (कवी व गीतकार) : व्यावसायिक लेखनाच्या धावपळीत मला हवं ते लिहायचं राहून जातं. गुलजार, ग्रेस, रॉय किणीकर व सुरेश भट यांच्याबद्दल समर्पणाच्या भावनेतून करायचं लिखाण मला मार्गी लावायचं आहे. जागतिक चित्रपटांचा आस्वाद घेत आहे. वेब सीरिज या नव्या माध्यमाचा अभ्यास करतो आहे. नव्या कविता संग्रहाचं काम पूर्ण केलं आहे. घरातल्यांसोबत वेळ घालवायला मिळाल्याचा आनंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What artists are doing