coronavirus मी समाजाचा शत्रू आहे...घरी नाहीच थांबणार! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

पोलिसांनी काही ठिकाणी रस्त्यावरून फिरणाऱ्यांना चोप देण्यास सुरवात केली. तर काही भागात पोलिसांनी शक्‍कल लढवत गर्दी रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. 

जळगाव : संचारबंदी लागू असताना अगदी रस्त्यांवर मोकळ्या पद्धतीने वावरत आहेत. कारण नसताना रस्त्यांवरून मोटारसायकल घेवून देखील नागरीक फिरत आहेत. कोणाचेही ऐकण्यास तयार नसल्याने हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अनोख्या शक्‍कल लढविली. मोटारसायकलवर फिरणाऱ्यांच्या हातात "मी समाजाचा शत्रू आहे...घरी नाहीच बसणार!' अशा आशयाचे फलक हातात देत आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आटोक्‍यात आणण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात देखील संचारबंदी सुरू झाली आहे. असे असताना देखील सकाळपासून रस्त्यांवर नागरीक निघाले होते. कोणी पायी तर कोणी मोटारसायकल घेवून बाहेर पडले होते. रस्त्यांवर पोलिस असताना देखील त्यांना न जुमानता नागरीक गर्दी करत होते. यामुळे पोलिसांनी काही ठिकाणी रस्त्यावरून फिरणाऱ्यांना चोप देण्यास सुरवात केली. तर काही भागात पोलिसांनी शक्‍कल लढवत गर्दी रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. 

त्यांना बनविले समाजाचे शत्रू 
खूप प्रयत्न करूनही लोक घरात थांबण्यासाठी तयार नसल्याने पोलिसांनी आता वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरवात केली. यात सिंधी कॉलनीजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडवून "मै समाज का दुश्‍मन हू...घर मे नही बैठूंगा' असे फलक हातात देवून त्यांच्याकडून वदवून देखील घेतले. पोलिसांनी सुरू केलेल्या या गांधिगिरीचा उपयोग होईल का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sancharbadi jalgaon city corona virus police gandhigiri