पिंपरीतील अरुण वाणी ठरताहेत 'विघ्नहर्ता' 

सुवर्णा नवले 
Tuesday, 8 September 2020

प्लाझ्मासाठी धडपड; संकटसमयी अनेकांना मोलाचा सल्ला, पिंपरीत प्रथम क्वारंटाइन होणारे वाणी कुटुंब 

पिंपरी : अर्ध्या रात्री कोणाला प्लाझ्मा हवाय. कोरोनामुळे जेवणाचे हाल होताहेत. दवाखान्यात दाखल होताना नेमकं काय करायला हवं? गोळ्या-औषधे व डॉक्‍टरांची मदत हवी अशा एक ना अनेक प्रकारच्या अडचणी सतावतात, तेव्हा खरंच साक्षात विघ्नहर्ताच डोळ्यासमोर उभा राहतो. स्वतः:च्या कुटुंबात सर्वांनाच कोरोना झाला अन्‌ तो इतरांसाठी "देवदूत' ठरला. आजही नागरिकांच्या मदतीसाठी ते धावून जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अरुण वाणी हे पिंपरीतील वैभवनगर येथे राहणारे. शिक्षण अवघे दहावी. पेशाने बांधकाम व्यावसायिक. मात्र, समाजकार्याची आवड. शहरात दांडगा संपर्क. लॉकडाउनपासून नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या प्रत्येक समस्येवेळी ते धावून गेले. सर्वांना काळजीपोटी पोटतिडकीने आरोग्याची काळजी घ्यावयास सांगणारे. मात्र, जेव्हा ते स्वतः:च पॉझिटिव्ह आले तेव्हा पिंपरी-चिंचवड शहरात प्रथम क्वारंटाइन होणारे तेच ठरले. कुटुंबातील व्यक्तींमध्ये हळूहळू लक्षणे दिसू लागली. इतरांच्या मदतीसाठी धावून जाणारे. मात्र कुटुंबासाठी रुग्णवाहिकाही वेळेत मिळाली नाही. त्यांच्याच वाहनातून त्यांनी स्वतः:च पीपीई कीट घालून कुटुंबीयांच्या तपासण्या केल्या. आई, वडील, पत्नी, मुलगा सर्वच पॉझिटिव्ह आले. मुलाच्या नीट परीक्षेची त्यांना सर्वाधिक काळजी वाटू लागली. आई-वडिलांना उपचारासाठी त्यांनी दवाखान्यात ठेवलं. सर्व मित्रमंडळी व सोसायटीतील त्यांच्या मदतीसाठी धावून आले. स्वतः:च्या जेवणापासून ते घरातील कामाचं त्यांनी काटेकोरपणे पालन केलं. घरात सर्व गोष्टी हाताशी उपलब्ध असूनही त्यांनी घरातील सर्व कामे केली. त्यानंतर थोड्याच दिवसांत कुटुंबीय सावरल्यानंतर सर्वांच्या मदतीसाठी पुन्हा ते सज्ज झाले. मात्र, सर्वांना काळजी घेण्याचं ते आव्हान आजही करत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशीही मदत... 
शहराच्या बाहेरही इंजेक्‍शन व गोळ्या औषधांचा तुटवडा झाला किंवा डॉक्‍टरांची मदत हवी. व्हेटिंलेटर नाही अशा प्रसंगी ते डॉक्‍टरांसोबत संपर्क करून बोलत होते. ड्रग्ज असोसिएशन व विविध संस्थाही त्यांना मदत करत होत्या. गोळ्या औषधांचा शहरात तुटवडा झाल्यास ते उपलब्ध करून देत. लॉकडाउनच्या काळातही त्यांनी मिलिटरीमध्ये इन्फ्रारेड गन पुरवल्या तसेच पोलिसांच्या सुरक्षेसाठी चष्मे पुरविले. दिवसभर ते प्लाझ्मासाठी शोधाशोधही करीत असतात. आतापर्यंत त्यांनी बऱ्याच जणांना प्लाझ्मा मिळवून दिला आहे. वायसीएममध्ये प्लाझ्मा मशिनची गरज आहे. नागरिक ताटकळत उभा राहत आहेत. वेळेत प्लाझ्मा मिळायला हवा. 

कोरानोमुळे कोणाचे जेवणाचे हाल होऊ नये, यासाठी घरात प्लॅस्टिकचे टिफीन आणून ठेवले आहेत. नातेवाईक व मित्रमंडळींचे कॉल आल्यास त्यांना जेवण पुरवितो. सर्वांना धीर देतो. प्लाझ्मा ग्रुप मिळविण्यासाठी दिवसभर कॉल सुरू असतात. वेळोवेळी सॅनिटायजर व मास्कविषयीही सूचना देतो. शिवाय अत्यावश्‍यक सुविधांसाठी मेडिकल विविध संस्था तसेच नागरिकांशी बोलणे सुरू असते. 
- अरुण वाणी, व्यावसायिक, पिंपरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Vani becomes 'Vighnaharta' in covid situation