कपिल देवही तसलेच; रवी शास्त्रींच्या निवडीची केवळ औपचारिकता? 

वृत्तसंस्था
Wednesday, 7 August 2019

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी परदेशी उमेदवारांवर कपिलदेव यांच्या सल्लागार समितीने जवळपास काट मारल्यामुळे रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती बहुतांशी निश्‍चित झाली आहे. 

नवी दिल्ली - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी परदेशी उमेदवारांवर कपिलदेव यांच्या सल्लागार समितीने जवळपास काट मारल्यामुळे रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती बहुतांशी निश्‍चित झाली आहे. 

कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची सल्लागार समिती संघ व्यवस्थापनातील विविध पदांच्या प्रशिक्षकांची नियुक्त करणार आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघांने चांगली कामगिरी केलेली आहे, असे मत समितीतील एका सदस्याने व्यक्त केले यावरून शास्त्री यांची फेरनियुक्ती निश्‍चित मानली जात आहे. 

भारतीय क्रिकेट संघासाठी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी आम्ही तेवढेचे उत्सुक नाही. गॅरी कर्स्टन ज्यांच्या मार्गर्दर्शनाखाली भारतीय संघाने कसोटीत अव्वल स्थान आणि विश्‍वकरंडक जिंकलेला आहे त्यांनीही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेला आहे त्यांचा विचार करणे क्रमप्राप्त असले तरी आमचे प्राधान्य भारतीयांसाठी असेल, तसेच विद्यमान संघ शास्त्री यांच्या मार्दर्शनाखाली चांगली प्रगती करत आहे. मग बदल कशाला, असे सल्लागार समितीतील एका सदस्याने सांगितले. यावरून शास्त्री यांच्या फेरनियुक्तीची औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे. 

भारतीय संघ बदल्याच्या प्रक्रियेत आहे. नवे खेळाडू संघात येत आहे अशा वेळी शास्त्री संघासोबत असणे महत्त्वाचे आहे, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वीच मत मांडले होते. शास्त्री आणि कोहली यांची जोडी संघाला प्रगतिपथावर ठेवत आहे. अशा परिस्थितीत बदल करणे अन्यायकारक ठरेल, बदल केल्यास संघाच्या मानसिकतेतही बदल होऊ शकतो, असेही या पदाधिकाऱ्याचे म्हणणे पडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapil Dev almost rejected application of every foreign player for the Indian Coach