क्रिकेट विश्वातील बादशाह सचिनचा प्रवास सदा अजरामर...

मंगळवार, 24 एप्रिल 2018

मी शोएबला तेव्हा उत्तर दिलं, नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला सांग, तो मारुन दाखवेल. त्यावेळी नॉन स्ट्राईकर एंडवर सचिन तेंडुलकर उभा होता. - विरेंद्र सेहवाग

क्रिकेट विश्वात सचिन तेंडूलकर हे नाव अजरामर आहे. या मास्टर ब्लास्टरचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिन क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी त्याच्या चाहत्यांच्या आणि भक्तांच्या मनात त्याचे स्थान नेहमीसाठी कोरले गेले आहे. सध्या सचिन आयपीएलमध्ये मुंबई इंडीयन्स संघाचा मेन्टॉर म्हणून काम सांभाळत आहे. 

सचिनच्या कारकिर्दीतले त्याच्या क्रिकेट रेकॉर्डप्रमाणेच अनेक किस्सेही गाजले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला विरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात दिलेले उत्तर. एका टीव्ही शोमध्ये अभिनेता शाहरुख खानने सचिनच्या खेळाविषयी सेहवागला विचारले, त्यावर सेहवागने शोएब अख्तरचा हा किस्सा सांगितला होता. सेहवाग म्हणाला, 'मी बॅटिंग करत होतो आणि शोएब बॉलिंग करत होता. शोएब प्रत्येक बॉल बाऊन्सर टाकत होता. शोएब मला म्हणाला, ‘हूक मारके दिखा’. मी शोएबला तेव्हा उत्तर दिलं, नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला सांग, तो मारुन दाखवेल.' त्यावेळी नॉन स्ट्राईकर एंडवर सचिन तेंडुलकर उभा होता आणि सचिनने पुढच्याच ओव्हरला शोएबच्या बाऊन्सरवर सिक्सर लगावला. तेव्हा सेहवाग शोएबला म्हणाला, 'बेटा बेटा होता है, और बाप बाप होता है.' सचिनच्या कारकिर्दीतील हे काही महत्त्वाचे टप्पे...

 • भारतच नव्हे तर साऱ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनसमोर प्रत्येक क्रिकेटर त्याच्या यशाचे धडे घेतो.
 • सचिन आतापर्यंत भारतासाठी 400 हून अधिक एकदिवसीय सामने आणि 200 कसोटी सामने खेळला आहे.
 • एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा तर कसोटी सामन्यामध्ये 15 हजार 921 धावा करुन सचिनने क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवले आहे.
 • सचिन बॅटींग करत असताना गोलंदाजी करण्यास धडकी भरली नाही असा जगातील एकही गोलंदाज बघायला मिळाला नाही. 
 • सचिन जगातील चौथा असा खेळाडू आहे, ज्याने सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला.
 • सचिन अवघ्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरोधात पहिला कसोटी सामना खेळला.
 • सचिन 19 व्या वर्षी काउंटी क्रिकेट खेळणारा सर्वात लहान खेळाडू आहे.
 • 20 वर्षांचा होण्याआधी सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतकं झळकावली होती. हा रेकॉर्डही अद्याप कुणी मोडला नाही.
 • एका वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्डही सचिनच्या नावावरच आहे. एका वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा सचिनचा रेकॉर्ड अद्याप कोणत्याही खेळाडून तोडला नाही. 
 • 1998 साली सचिनने 9 शतकांसह 1894 धावा केल्या होत्या.
 • सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये 463 सामने खेळला, ज्यामधील 108 मालिकांमध्ये सहभाग घेतला.
 • सचिनने 15 वेळा मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावला आहे. सचिनचा हा रेकॉर्डही अद्याप कोणी तोडला नाही.
   

सचिन तेंडुलकर भारतातील पहिला आणि एकमेवर खेळाडू आहे ज्याने रणजी, दिलीप आणि इराणी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकला. सचिन सुरुवातीला टेनिस प्लेयर जॉन मॅकनरोचा मोठा चाहता होता. शिवाय सचिनला क्रिकेटहून अधिक टेनिस खेळायला आवडायचे. सचिन तेंडुलकर असा एकमेव खेळाडू आहे ज्याला खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पद्म विभूषण आणि भारतरत्न या सर्व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2012 मध्ये सचिन तेंडुलकर हा राज्यसभेवर नियुक्त केलेला एकमेव क्रिकेटर ठरला आहे.  क्रिकेटचा देव म्हणून पुजल्या जाणाऱ्या सचिनवर आधारित 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar Birthaday Special Story