चहा, बिस्किटे आणि एकाग्रता......

अमित गोळवलकर
Saturday, 27 October 2018

चहात बिस्किट बुडवून खाल्ल्याने एकाग्रता वाढते? तुम्ही म्हणाल काही तरीच काय राव? पण हा मंत्र सांगितला चक्क एका विक्रमादित्यानं...होय क्रिकेटच्या विश्वातले विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी आज आपल्या एकाग्रतेचं एक रहस्य उघड केलं!

पुणे - चहात बिस्किट बुडवून खाल्ल्याने एकाग्रता वाढते? तुम्ही म्हणाल काही तरीच काय राव? पण हा मंत्र सांगितला चक्क एका विक्रमादित्यानं...होय क्रिकेटच्या विश्वातले विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी आज आपल्या एकाग्रतेचं एक रहस्य उघड केलं!

सुनील गावसकर यांनी आज पुण्याच्या डेक्कन जिमखाना क्लबला भेट दिली. आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळी बॅडपॅच आलेला असताना गावसकर यांनी याच मैदानावर (कै.) कमल भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला होता. आज जिमखान्याच्या भेटीत गावसकर यांनी अशा काही भेटींना उजाळा दिला. जिमखान्याच्या वतीने गावसकर यांना मानद सदस्यत्व देण्यात आले. त्याचाही त्यांनी नम्रपणे स्वीकार केला. या कार्यक्रमानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या शेवटी चहाचा कप आणि बिस्किटे समोर आली तेव्हा गावसकर यांना चहात बिस्किट बुडवून खाण्याचा मोह आवरला नाही. 

जाहीर कार्यक्रमात चहात बिस्किट बुडवून खाणे हे काही जण गावंढळपणाचे लक्षण समजतात. पण गरमागरम चहात बिस्किट बुडवून न तुटू देता खाणे याला तपश्चर्याच लागते. आज गावसकर यांनी चहा पिता पिता यालाच एका कथेची जोड दिली. चहात बिस्किट बुडवून खायला एकाग्रता लागते, असे सांगत गावसकर यांनी या 'एकाग्रते'चे प्रात्यक्षिकच दाखवले. 

एकाग्रतेची ही 'रेसिपी' काहीशी अशी होती....एका बशीत चार बिस्किटे मधली जागा सोडून लावून ठेवायची. मग एकाग्रतेने कपातला चहा त्या मध्यभागी ओतायचा. बिस्किटांचा मधला भाग चहाने भिजला की मग तितक्याच एकाग्रतेने या बशीतला चहा बिस्किट कपात न पडू देता पुन्हा कपात ओतायचा आणि मग एका बाजूला अर्धवट भिजलेले आणि अर्धवट कुरकुरीत असलेले बिस्किट चमच्याने खात कपातल्या चहाचा आस्वाद घ्यायचा....

हे प्रात्यक्षिक दाखवताना समोर असलेल्यांमध्ये हास्याची कारंजी उमटत होती. तिकडे समोर गावसकर मजेत डोळे मिचकावत चहात भिजलेले बिस्किट चमच्याने खात कपातला चहा संपवत होते आणि माझ्या एकाग्रतेत या चहा बिस्किट खाण्याचा मोठा वाटा आहे.... हे देखिल सांगत होते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil gavaskar talks at poona club