आंगणेवाडी वार्षिकोत्सव विशेष; अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान

आंगणेवाडीची भराडी माता सर्वच भक्तांना भरभरून देते. तिच्या वार्षिकोत्सवात सहभागी होणे म्हणजे भाग्याचे समजले जाते
Anganwadi Annual Festival  place of worship Maharashtra bharadi devi temple
Anganwadi Annual Festival place of worship Maharashtra bharadi devi templesakal

आंगणेवाडीची भराडी माता सर्वच भक्तांना भरभरून देते. तिच्या वार्षिकोत्सवात सहभागी होणे म्हणजे भाग्याचे समजले जाते. त्यामुळे सर्वच वयोगटातील भाविक वार्षिकोत्सवाच्या दिवशी मोठ्या संख्येने आंगणेवाडीत दाखल होतात. प्रत्येकाची केवळ एकच इच्छा असते, मातेचे दर्शन....! देवी भराडी चरणी असलेल्या केवळ तिच्या शक्तीची प्रचिती घेण्यासाठी, आत्मसुख अनुभवण्यासाठी मात्र तुम्हाला आंगणेवाडीतच यावे लागेल. गुरुवारी (ता. २४) हा योग येणार आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर मिळणारी शक्ती, ऊर्जा, चैतन्य काय असते, याची अनुभूती प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही. कोरोना महामारीच्या संकटात गतवर्षी हा वार्षिकोत्सव मर्यादित राहिला होता; मात्र यावर्षी भाविकांना भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. भराडी मातेच्या या वार्षिकोत्सवाबद्दल...

कोकण आणि येथील परंपरा यांचे एक वेगळे नाते आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात प्रत्येक गावात दिवाळीनंतर यात्रांना सुरुवात होते. यात्रा ठराविक तिथीला होत असतात; मात्र आंगणेवाडीच्या देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव यास अपवाद आहे. देवीच्या हुकुमाने ठरेल तो वार्षिकोत्सवाचा दिवस असतो. असे या वार्षिकोत्सवाचे स्वरूप असल्याने हे एक वेगळेपण मुद्दाम नमूद करावे लागेल. मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीच्या देवी भराडीने मने जोडण्याचे मोठे काम केले आहे. श्रद्धा, अंधश्रद्धेच्या वादात भराडी माता जगभरातील लेकरांवर कृपाशिर्वाद ठेवून आहे. याची प्रचिती प्रतिवर्षी भाविकांच्या वाढत गेलेल्या संख्येवरून दिसून येते. हा वार्षिकोत्सव मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आंगणेवाडीने आपले नाव भाविकांच्या मनात कोरले आहे.

या वार्षिकोत्सवाची सुरुवात नक्की कधी सुरू झाली याविषयी निश्चित अशी माहिती उपलब्ध नसली तरी साधारणपणे तीनशे सव्वातीनशे वर्षापूर्वी पूजा, अर्चा सुरू झाल्याचे जाणकार सांगतात. या वार्षिकोत्सवाचा दिवस ठरवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. त्याचप्रमाणे एकदा ठरवलेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलली जात नाही. वार्षिकोत्सवाचा दिवस निश्चित करण्यासाठी साधारण दोन महिन्यापूर्वीच म्हणजेच देव दिवाळीनंतर डाळप विधी म्हणजे डाळी मांजरी भरण्याचा कार्यक्रम होतो. यानंतर गाव पारधीसाठी देवीचा कौल घेतला जातो. जंगलामध्ये पारध म्हणजे डुकराची शिकार झाल्यानंतर मोठ्या उत्साहात डुकराची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डाळी विधी झाल्यानंतर सगळे ग्रामस्थ मंदिरात जमा होऊन देवीचा कौल घेतात व वार्षिकोत्सवाची तारीख निश्चित केली जाते. वार्षिकोत्सवाच्या दिवशी अगदी पहाटेपासून गर्दी होत असल्याने मागील काही वर्षे ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजल्यापासून सुरुवात करण्यात येते. उत्सवादिवशी देवीची मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. पाषाणात मुखवटा घालून साडी-चोळी नेसवली जाते. मानकऱ्यांच्या ओट्या भरल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले होते. उत्सवाच्या दिवशीची पहाट भाविकांच्या गर्दीने उजाडते. लगतच्या गावातील भाविक अगदी भल्या पहाटे दर्शन रांगेत राहून देवीचे दर्शन घेतात व कृतार्थ होतात. देवीची ओटी खण, नारळ, सोन्याच्या लोण्याने भरली जाते. नवस असल्यास त्याप्रमाणे गोड पदार्थ, पेढे, मिठाईचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. तमाम भाविक काही तास रांगेत राहून देवीचे दर्शन घेतात. नवस बोलणे, फेडणे, तुलाभार सुद्धा केला जातो.

पहाटेपासून सुरू असलेला ओट्या भरण्याचा कार्यक्रम रात्री दहाच्या दरम्यानच्या काळात बंद होतो व यानंतर आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील स्त्रियांनी बनवलेला प्रसाद देवीला नैवेद्य म्हणून दाखविला जातो. ‘ताटे लावण्याचा’ हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असतो. प्रसाद घेऊन माघारी परतताना हा प्रसाद भाविकांना पूर्वी वाटला जायचा. परंतु यावेळी हा प्रसाद मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व्हायची. प्रचंड चेंगराचेंगरीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी व्यवस्थापनाने देवालयाच्या मागील बाजूस प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे. ताटे लावण्याच्या कार्यक्रमानंतर आंगणेवाडीच्या प्रत्येक घरात प्रसादासाठी पंगती बसतात. अगदी अनोळखी लोक सुद्धा या पंक्तीत दिसून येतात. समस्त आंगणे कुटुंबीय प्रसादासाठी घरी येणाऱ्या भाविकांना पाहुण्यांचा मान देऊन त्यांना प्रसादाला बसवतात. उत्सवात साधारणपणे दोन किलोमीटरपर्यंत दुकाने थाटली जातात. लहान मुलांसाठी आकाश पाळणे, फनी गेम्स यासह सर्व प्रकारच्या वस्तू या वार्षिकोत्सवात मिळत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल दोन दिवसात होते. वार्षिक उत्सवाचा मुख्य दिवसाच्या दुसऱ्या दिवशी मोड यात्रा असते. या दिवशी आंगणे कुटुंबीय ओट्या भरतात. सायंकाळी उशिरा गर्दीचा ओघ कमी झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता होते व धार्मिक पद्धतीने यात्रेची सांगता होते. वार्षिकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम होतो. आपण घरामध्ये सर्व देवी-देवतांचे फोटो लावतो; परंतु आंगणेवाडीच्या भराडी देवीचे छायाचित्र सापडणे मुश्कील. अगदी आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबीयांच्या घरीसुद्धा नाही. देवीचे छायाचित्र कोणीही छापू नये अथवा प्रसिद्ध करू नये, असा एक नियमच आहे.

राजकारण्यांची मांदियाळी

आंगणेवाडीची भराडी माता अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बनली आहे. या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याने प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. आंगणेवाडी कुटुंबीय भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण योजना राबवित असतात. भाविक हाच केंद्रबिंदू मानून एकंदर सर्व नियोजन त्यांच्याकडून केले जाते. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक या वार्षिकोत्सवात सहभागी होतात. भराडी देवीमुळे आंगणेवाडीची पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रसिद्धी दुरवर पसरली आहे. विविध पक्षांच्या राजकारण्यांची मांदियाळी या वार्षिकोत्सवात अनुभवता येते.

सदैव भक्तांचा ओढा

वार्षिकोत्सवाच्या दिवशी भाविक भराडी मातेच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. यावर्षी भाविकांना सुलभ व सुरक्षितरीत्या देवीचे दर्शन मिळावे यासाठी योग्य नियोजन केले असून कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कठीण प्रसंगी ‘देवीला हाक मारा, देवी तुमच्या मदतीस निश्चित धावेल,’ अशी भाविकांची श्रद्धा बनल्याने देवीच्या मंदिरात पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे, शिर्डीच्या श्री साईबाबांप्रमाणे सदैव भक्तांचा ओढा असतो. मनाला प्रचंड ऊर्जा देणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणाऱ्या देवी भराडी चरणी कोटी कोटी प्रणाम.

यात्रेसाठी जादा बसेस

एसटी महामंडळाकडून आंगणेवाडी यात्रेसाठी उद्या (ता. २४) सकाळी सात वाजल्यापासून दहा बसेस सोडण्यात येणार आहेत. यात कणकवली आगारातून ४ मालवण ३ व कुडाळ ३ गाड्या धावणार आहेत. या बस फेऱ्या त्या त्या आगारातून दिवसभर धावणार आहेत. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यंदा एसटीची सेवा गेले तीन महीने बंद आहे. जिल्हातील विभागात काही कर्मचारी सेवेत दाखल झाल्याने कणकवली, मालवण, सावंतवाडी आगारात काही बसफेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यातील यात्रेसाठी एसटीची दरवर्षी चांगली सेवा असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com