शौर्याची, संस्कृतीची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gudi padwa festival

गुढीपाडव्याचा हा सण सामाजिक एकोपा कायम राहावा हेच सांगतो. कारण, सगळ्यांनी गुढ्या उभारून स्वागत केले पाहिजे.

शौर्याची, संस्कृतीची परंपरा

गुढीपाडव्याचा हा सण सामाजिक एकोपा कायम राहावा हेच सांगतो. कारण, सगळ्यांनी गुढ्या उभारून स्वागत केले पाहिजे. याचा अर्थ कोणी एकट्याने करण्याचे हे काम नाही. समाजात कोणताही भेदभाव नाही. सर्वजण समान आहेत, समानतेच्या पातळीवरच असे उत्सव आम्ही साजरे करीत असतो. गुढी हे त्याचे झाले एक प्रतीक.

वसंताच्या आगमनाने मोहरलेल्या सृष्टीच्या, सोनेरी किरणात उगवत्या सूर्याला, तेजाला वंदन करून, गुढ्या तोरणे उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याचा, साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा.

चैत्र महिन्यात नवनिर्मितीचे संकेत देत झाडांना नवीन पालवी फुटलेली असते; हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू होत असतो अशा वातावरणात कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील जंतूंचा नाश होतो म्हणून गुढीपाडवा सणांमध्ये कडुलिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व देत आरोग्यदायी संदेश दिला जातो. गुढी हे विजयाचे, समृद्धीचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते.

उत्सवाची पंरपरा

हा उत्सव का साजरा करायचा? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक दाखले मिळतात. वर्षप्रतिपदेपासूनच ऐतिहासिक विजयाचे प्रतीक असलेल्या विक्रम संवताचा प्रारंभ होतो. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममाण असणे असा तेजात रममाण असलेल्या आपल्या या भारत देशावर अनेक आक्रमणे झालीत. विक्रमादित्याच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाने झुंज देत ऐतिहासिक विजय मिळवला या विजयाचे स्मरण राहावे म्हणून विक्रम संवत सुरू झाले. राजा विक्रमादित्यने शकांवर विजय मिळविला तरीही ही आक्रमण थांबली नव्हती. विक्रमादित्या नंतर सुमारे सव्वाशे वर्षांनी पुन्हा शकांनी भारतावर आक्रमण केले. यावेळी शालिवाहनाने हिंदू राष्ट्राचे नेतृत्व केले. असे म्हणतात की, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण फुंकून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला आणि म्हणून गुढ्या तोरणे उभारावी. त्या विजयाची स्मृती म्हणून याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरू झाले. शक सुरू करणारा हा पहिला महाराष्ट्रीयन राजा. या शालिवाहन शकात एकूण ६० संवत्सरे आहेत यातील ३६ वे संवत्सर शुभकृत नाम संवत्सराची सुरवात आज होत आहे.

असा पराक्रमाची आठवण करून देणारा, पुढे पुढे मार्गक्रमण करणेसाठी नवीन चैतन्याने, भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या या गुढीपाडव्या बद्दल खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात..

‘गुढीपाडव्याचा सन, आतां उभारा रे गुढी,

नव्या वरसाचं देनं, सोडा मनांतली आढी

गेल सालीं गेली आढी, आतां पाडवा पाडवा,

तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा’

Web Title: Aparna Nagesh Patil Writes Gudi Padwa Festival Celebration Hinu New Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top