Appasaheb Dharmadhikari : विचारधन!

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समर्थ रामदासांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करीत समाजाचे प्रबोधन केले असून, योग्य मार्ग दाखवला आहे.
Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikarisakal

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समर्थ रामदासांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करीत समाजाचे प्रबोधन केले असून, योग्य मार्ग दाखवला आहे. या विचारांतून मनुष्य आपले दैनंदिन व्यवहार सुधारू शकतो आणि नीतीच्या मार्गावरून चालत आपली प्रगती साधू शकतो. आप्पासाहेबांनी समर्थ रामदासांचे विचार व त्यांच्या ‘श्रीमत् दासबोधा’चा आधार घेऊन मांडलेल्या अशाच काही विचारांचे वेचलेले हे धन खास तुमच्यासाठी...

स्वधर्म

श्रीसमर्थ रामदास स्वामी स्वधर्म, स्वदेश व स्वदेव या संकल्पनांबाबत सातत्याने संपूर्ण समाजाला शिकवण देत आले आहेत. त्यांची ही शिकवण कालातीत भूमिकेतील व विश्वात्मक स्वरूपाची आहे. श्रीसमर्थांनी या शिकवणीतून समाजाला संजीवनी दिली आणि नवचेतना जागृत केली. त्यातून नवसमाज घडविला. म्हणून सर्वप्रथम श्रीसमर्थांची याबाबतची शिकवण समजावून घेतली पाहिजे व नंतर आजच्या संदर्भात त्यांचे अनुसरण संपूर्ण समाजाने कशाप्रकारे करायचे, याचा विचार केला पाहिजे.

श्रीरामदास स्वामींचे वैचारिक नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्व पाहून ते खऱ्या अर्थाने युगपुरुषच आहेत, हे लक्षात येते. श्रीसमर्थांचे संपूर्ण प्रतिबिंब श्रीमत् दासबोध या ग्रंथात आहे. या ग्रंथाचे श्रवण केल्यावर आत्मचिंतनातून आपल्याला कळते की, स्वधर्म म्हणजे मानवता धर्म होय. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोत, त्यामुळे आपण मनुष्य म्हणूनच जगले पाहिजे. मनुष्य म्हणून जगायचे तर आपसांतील नात्यांचा आदर व सन्मान राखला गेला पाहिजे.

मानवता धर्म हा चारही युगांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आजच्या संदर्भातसुद्धा हा धर्म संपूर्ण विश्वासाठी लागू पडतो. संपूर्ण विश्वाला खरी विश्रांती व समाधान प्राप्त करवून देणारे सामर्थ्य त्यामध्ये दडलेले आहे. मानवनिर्मित धर्म हे मानवता धर्मासमोर फारच थिटे आणि मर्यादित स्वरूपाचे आहेत.

स्वदेश

स्वदेश म्हणजे आपल्या आईच्या उदरात घडविला गेलेला आपलाच देह होय. अत्यंत पवित्र या देहात जन्माला आल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय व चिंता या आठ विकारांचा प्रवेश झाला. हळू हळू या आठ विषयांनी या स्वदेशाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आणि या आठ विषयांच्या तंत्राने देह चालायला लागला. म्हणजे विषयांनी याला परतंत्र केले. म्हणून या देशाचे स्वातंत्र्य सांभाळले पाहिजे. श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या श्रवणातून हे घडू शकते.

म्हणून श्रवणाला बसणे हे या स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी अपरिहार्य आहे. आजच्या संदर्भातसुद्धा आपल्याला दिसते की, मनुष्याजवळ भौतिक सुखांची रेलचेल आहे. परंतु अंतरी या आठ विषयांनी पोखरल्यामुळे मनुष्य असमर्थ व असहाय अवस्थेत आला आहे. म्हणून अंतरीची श्रीमंती आल्याशिवाय खऱ्या अर्थाने हा स्वदेश स्वतंत्र राहू शकत नाही. श्रवणाच्या मार्गावर आपण असलो तरच या स्वदेशाचे स्वातंत्र्य अबाधित राहील.

देहप्रपंच

श्रीसमर्थांना प्रपंच म्हणजे आपला देहप्रपंच अभिप्रेत आहे. यामध्ये आपली पंचभूते, त्रिगुण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण, विषय, वासना, कल्पना, भावना, देहबुद्धी यांचा समावेश आहे. आपल्या देहाचे नित्य व्यवहार उत्तम चालण्यासाठी यांचे प्रमाण देहनिर्मितीच्या वेळेपासून निश्चित झालेले असते. शरीरस्वास्थ निरोगी ठेवण्याबरोबरच नरदेहाचे सार्थक कशात आहे, याबाबत अतिशय सूचकपणे श्रीसमर्थांनी म्हटले की,

‘देह परमार्थी लाविले।

तरीच याचे सार्थक झाले।

नाही तरी हे व्यर्थचि गेले।

नाना आघाते मृत्यूपंथे।।’

यासाठी मनुष्याजवळ आवश्यक आहे तो परमार्थ विवेक. परमार्थ म्हणजे ज्या परम अर्थावर देहप्रपंच आधारित आहे व ज्यायोगे चालतो तो. म्हणजेच देहप्रपंचाचे नेटकेपण परम अर्थाच्या स्मरणाशी निगडित झाले तर उत्तम समन्वय देहात साधला जातो. हा समन्वय व संतुलन साधण्यासाठी आवश्यक आहे तो विवेक! हा विवेक असेल तरच चांगले काय वाईट काय, क्षेत्र काय व कनिष्ठ काय, उत्तम काय आणि हीन काय याची पारख मनुष्य करू शकतो. या विवेकाचा उपयोग प्रत्येकाने सद्‍गुणांसाठी, सदविचारांसाठी व सदाचरणासाठी अर्थातच मानवता धर्माच्या पालनासाठी केला पाहिजे.

स्वदेव

स्वदेवाबाबतची शिकवण देताना श्रीसमर्थ म्हणतात की, आपल्या संपूर्ण देहाला जी आंतरिक चैतन्यशक्ती चालविते ती शक्ती म्हणजेच आपला स्वदेव होय. आपण आपली ओळख आपला देह म्हणून घेतो, अशी ओळख घेताना ज्या चैतन्याच्या सामर्थ्यावर देहाचे सर्व व्यापार व व्यवहार चालतात त्या शक्तीलाच आपण विसरतो. जेथे हे विस्मरण असते तेथे देहाचे तारू भरकटलेल्या अवस्थेत असते. परिणामस्वरूप आंतरिक दैन्यावस्था ओढवली जाते.

म्हणूनच कुविचार, अवगुण, विषयवासनांचे साम्राज्य वाढले जाते. यासाठी श्रीसमर्थांनी श्रीमत् दासबोधाच्या श्रवणातून या चैतन्यशक्तीची ओळख सातत्याने प्रत्येकाच्या अंतरी बिंबवली आहे. ज्याच्याजवळ स्वदेवाची शिकवण आहे, त्याच्याजवळ आंतरिक सामर्थ्याचा खजिनाच आहे. प्रत्येक प्रसंगावर मात करण्याचे सामर्थ्य या खजिन्यात दडले आहे. या सामर्थ्याच्या स्तोत्राच्या बाबतीत स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो.

विवेक

आजच्या संदर्भात समन्वय व संतुलन घडवून आणणारा विवेक अधिक गरजेचा आहे. मनुष्य देहसुख व भौतिक सुखांच्या मागे धावतो आहे. ही सुखे आवश्यक असली तरी या धावपळीत मनुष्याचे त्याच्या अंतरंगाच्या विकासाकडे दुर्लक्ष झालेले आहे. म्हणून या विवेकाअभावी मनुष्याचा विकास एकांगी होत आहे. यातून नरदेहाचे सार्थक घडणार नाही. संत वाङ्‍मयाच्या श्रवणातूनच हा विवेक पिंडात सुदृढ होतो. मनुष्याच्या अंतर्बाह्य विकाची गरज त्याला समजते व पटते.

ही घडून येण्यासाठी अंतरी ओढ लागते. आपण परम अर्थाला विसरून फक्त देह प्रपंचाकडे लक्ष दिल्यास शाश्वत समाधान मिळणार नाही. तसेच देहप्रपंचाकडे दुर्लक्ष करून केवळ परम अर्थाकडे लक्ष दिले तर देहप्रपंच बिघडेल व परम अर्थाकडे लक्ष लागणार नाही. यासाठी दोघांमध्ये संतुलन व समन्वय साधणाऱ्या विवेकाची प्रत्येकाला गरज आहे. म्हणून श्रीसमर्थांच्या शिकवणीची उपयुक्तता आजच्या धकाधकीच्या जीवनात जास्त आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. अर्थात, हे संतुलन साधणारा विवेक मिळविण्यासाठी संत वाङ्‍मयाच्या प्रासादिक निरूपणाच्या श्रवणाची नितांत गरज आहे. यातूनच चिंतन घडून विवेकयुक्त आचरणाकडे मनुष्य वळेल.

श्रवण

श्रवणभक्ती ही परंपरागत चालत आलेल्या भक्तिमार्गापेक्षा वेगळी आहे. विशद करताना सांगितले की, श्रीसमर्थांनी श्रवणभक्तीचे महत्त्व मानवता धर्माचे संस्कार घडविण्याचे सामर्थ्य या श्रवणभक्तीत आहे. आपले अंतरंग आमूलाग्र बदलविण्याचे सामर्थ्य या श्रवणात आहे. सहजगुणांचा नाश करून सद्गुणांचे रोपण करणारी ही भक्ती आहे. या श्रवणाच्या भक्तीतूनच आपली चंचल वृत्ती निश्चल व संथ होते. विषय वासनांचे काहूर थंडावते. अनेक समस्यांचे मूळ आपल्या मनोव्यापारांमध्ये आहे. श्रवणातून बेलगाम व नाठाळ मनाला लगाम घातला जातो. म्हणून श्रीसमर्थांनी म्हटले आहे की,

‘मनाची शते ऐकता दोष जाती ।

मतिमंद ते साधनायोग्य होती ।

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।

म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी ॥’

म्हणून श्रवणाच्या माध्यमातून माणसाची वृत्ती व मनाची घडण निकोप व निरोगी होते. आंतरिक श्रीमंती वाढते. आपले मन हे श्रीमन होते.

श्रीसमर्थबैठक

श्रवणातून संस्कार घडविणारी कायमस्वरूपी व्यवस्था असली पाहिजे. ही व्यवस्था म्हणजेच श्रीसमर्थबैठक होय. दर आठवड्यात ठरलेल्या निश्चित वारी व वेळेत सर्व श्रीसदस्य एकत्र येतात व बसून ऐकतात. श्रवण, मनन व निजध्यासाचे प्रभावी थोडक्यात बैठक ही निरूपणातून माध्यम आहे. यातूनच मानवाला ज्ञान, वैराग्य व सामर्थ्याची प्राप्ती होते व त्याचे अंतःकरण निर्मळ होते. यासाठी नियमित वेळापत्रकानुसार कार्य चालते. पुरुष, महिला व बालवर्ग यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अगदी वेळेनुसार श्रीबैठकीत श्रवणसंस्कार सुरू होतात व वेळेवरच आटोपली पाहिजे याबाबत कटाक्ष असतो. हे श्रवणसंस्कार निःशुल्क होत असले तरी शिस्तीबाबत कोणतीही तडजोड होत नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ही शिस्त लादलेली नाही. या बैठकीमध्ये बसून श्रवण केल्यावर प्रत्येकाच्या अंतरी मानवता धर्माची व मानवी नीतिमूल्यांची बैठक घातली जाते. मनुष्य खऱ्या अर्थाने जागा होतो आणि त्याला मानवी धर्माच्या आचरणाचा ध्यास लागतो.

बलप्रतिष्ठा

सर्व प्रकारच्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून माणूस म्हणून समाजात उभे राहण्याकरिता बळ लागते. अशा व्यक्तींना यशस्वी व सार्थक जीवन जगताना जी प्रतिष्ठा प्राप्त होते, ती बलप्रतिष्ठा होय. मानवाकडे बाह्य बळ बरेच आहे. परंतु अंतरातून तो पोखरला आहे. दुबळा झाला आहे. मनाचा दुबळेपणा स्वतःहून झटकून जात नाही. आध्यात्मिक निरूपण असेल तर मनाकडे आत्मस्थिती येते व मनुष्य अंतरातून सामर्थ्यात उभा राहतो. याच बळाच्या आधारे मनुष्य प्राप्त असलेल्या स्थितीत मोठ्या आनंदाने, सुख-समाधानाने आणि शांतीने राहतो.

भेद

मानवी समाज दुभंगला आहे, पण तो का दुभंगला आहे, याची समूळ ओळख करून घ्यावी लागेल. आज समाजाच्या खंडप्राय अवस्थेचे प्रमुख कारण मानवनिर्मित भेद हे आहे. धर्म, वर्ण, जाती, पंथ, समुदाय, प्रांत, भाषा अशा अनेक प्रकारांनी मानवी समाजाचे विघटन केले आहे. काही विशिष्ट कारणांसाठी व विशिष्ट वेळी हे आवश्यक असले तरी ‘भेदाभेद अमंगल’ हे श्रीसमर्थांचे सूत्र आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

मानवी समाजात या भेदांमुळे मतभेद विकोपाला गेलेत. म्हणून प्रत्यक्षात भांडण, तंटे, मारामाऱ्या, दंगली, लढाया, जाळपोळ, परस्परांमध्ये वैरभाव, द्वेष, मत्सर, तिरस्कार इत्यादी बाबींचा अतिरेक झालेला दिसतो. आपल्याकडे सामाजिक एकतेबाबत अनेक उपाय सांगितले जातात. यावर चर्चासुद्धा होतात. तथापि सामाजिक ऐक्याचा खरा अर्थ कोणाला कळलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

माणसा-माणसांमधील भेद मिटवून टाकण्यासाठी उपचारात्मक उपाय एकच आहे व तो म्हणजे संत वाङ्मयाच्या श्रवणाचा राजमार्ग होय. या श्रवणाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याच्या लक्षात येते की, सर्वांची शरीररचना एकसारखीच आहे. या शरीरात वाहणारे रक्तसुद्धा सारखेच आहे. मानवता धर्माची शिकवण मनुष्याच्या अंतरी रुजली की बाह्य भेदांवर सहजपणे मात होते आणि साहजिकच आपापसात उत्तम गुण जोपासले जातात. प्रेमभाव, जिव्हाळा, आपलेपणा हे व्यक्तिपरत्वे मनुष्याच्या क्षमतांमध्ये फरक राहू शकतो. परंतु मानव म्हणून जगण्याचा प्रत्येकाला सारखाच अधिकार आहे, ही जाणीव लागते.

श्रीमत् दासबोध

श्रीसमर्थांनी निर्माण केलेला ग्रंथराज श्रीमत् दासबोध हा संपूर्ण युगासाठी उपयुक्त असा ग्रंथ आहे. समर्थांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती, संदर्भ आणि गरजांनुसार ग्रंथाची रचना केली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक घडामोडी झाल्या. अनेक राजवटी बदलल्या. सामाजिक स्थित्यंतरे झाली. अनेक सामाजिक व राजकीय संदर्भ बदलले. तरीही या ग्रंथाचे ताजेपण आजही कायम आहे. याचे मुख्य कारण हेच की संतवाङ्मय नेहमी ‘अक्षर वाङ्मय’ असते. आज मनुष्याने विज्ञानाची कास धरून नेत्रदीपक भौतिक समृद्धी साधली आहे.

त्यानुसार आधुनिक काळातील मनुष्याचे राहणीमान बदललेले आहे. भौतिक सुखाची अनेक साधने आज उपलब्ध आहेत. तरीही मनुष्याजवळ शाश्‍वत सुख व समाधान नाही. कारण त्याचे आंतरिक सामर्थ्य फारच कमी झालेले आहे. समस्या बाहेरून बोचत असतात. पण त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक सामर्थ्याचा अभाव आहे. म्हणून अंतरंगामधून हीन-दीन अवस्था झालेली आहे. म्हणूनच आज श्रीसमर्थांच्या काळातीत विचारांच्या शिकवणीची अतिशय आवश्यकता आहे. ही शिकवण घेण्यासाठी मनुष्याने श्रवणाची कास धरली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com