आनंददायी वटवृक्ष

विश्र्वाची सुरुवात ही हिरवळीपासून, वृक्ष-वनस्पतीपासून झालेली आहे. सर्व प्राणिमात्रांचे जीवन हे वनस्पतींवर अवलंबून आहे.
vat purnima
vat purnimasakal
Summary

विश्र्वाची सुरुवात ही हिरवळीपासून, वृक्ष-वनस्पतीपासून झालेली आहे. सर्व प्राणिमात्रांचे जीवन हे वनस्पतींवर अवलंबून आहे.

भारतीय परंपरा ही वैश्‍विक परंपरा आहे, ज्ञानाधिष्ठित परंपरा आहे. सर्व प्राणिमात्रांचे व मनुष्यमात्रांचे जीवनमान सुखी होऊन सर्वांना समाधानाने, शांततापूर्वक सहजीवन जगता येण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान जे केवळ स्मृतीवर किंवा सिद्धांतावर आधारलेले नाही तर अनुभवजन्य आहे, ते समस्त मानवजातीला उपलब्ध करून देण्याचे काम आपली भारतीय संस्कृती करत असते. याच उद्देशाने हजारो वर्षांपासून साजरा होणारा भारतीय परंपरेतील एक सण आहे ‘वटपौर्णिमा’. वटवृक्षाच्या सान्निध्यात राहण्याच्या, वटवृक्षाची पूजा करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे जतन करण्याचा हा दिवस.

विश्र्वाची सुरुवात ही हिरवळीपासून, वृक्ष-वनस्पतीपासून झालेली आहे. सर्व प्राणिमात्रांचे जीवन हे वनस्पतींवर अवलंबून आहे आणि म्हणून भारतीयांनी वृक्षसंपदेची केवळ जोपासना नाही, तर पूजन करण्याची सुरुवात केली, वृक्षांना देवत्वच नाही तर गुरूंची उपाधी दिली, सग्यासोयऱ्यांचे स्थान दिले.

धत्ते भारं कुसुमपत्र फलावलीनां

घर्मव्यथां वहति शीतभवं रुजं च ।

यो देहमर्पयति चान्यसुखस्य हेतोः

तस्मै वदान्यगुरवे तरवे नमोऽस्तु ॥

या श्र्लोकात स्पष्ट म्हटले आहे की गुरू स्वतः तपस्या करून शिष्याचे आयुष्यमान, जीवनमान उंचावण्यासाठी मदत करतात तसेच वृक्ष स्वतः उन्हा-पावसाला तोंड देतात परंतु माणसाला सावली व गोड फळे देतात. म्हणून म्हटले आहे या गुरुरूपी तरुला माझा नमस्कार असो.

गुरू आपल्या भावनाविश्र्वातील शेवटची पायरी आहे. आपल्याला पूज्य असणारे मातापिता, देवदेवता यासारखे सर्व प्रेमाचे संबंध ज्या ठिकाणी येऊन थांबतात, ज्याच्या पुढे कोणत्याही प्रकारचे द्वैत शिल्लक राहत नाही, अशी ओतप्रोत प्रेम व ज्ञानाची जी पायरी ती गुरूची आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘गुरवे तरवे नमः’. याच्याही पुढे जाऊन संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’. हे सर्व वृक्ष व वनचर हीच आमची खरी मित्रमंडळी व सोयरी आहेत.

भारतीय ऋषिमुनींनी वृक्षांना इतके महत्त्व दिले आहे की एका पायरीवर तो वृक्ष न राहता ‘कल्पवृक्ष’ या मर्यादेपर्यंत येऊन पोचतो. कल्पवृक्षाच्या सावलीत जी इच्छा किंवा कल्पना केली जाईल ती ताबडतोब फलद्रूप होते. वड, पिंपळ, औदुंबर यासारख्या वृक्षांची जवळजवळ अशीच महत्ता वर्णन केलेली सापडते. सदैव सद्‌गुरुंचा वास असलेल्या औदुंबरात मरणप्रक्रिया थांबवण्याचे सामर्थ्य असते. पुत्रोत्पत्ती, बीजसंवर्धन व सृष्टिचक्र कायम चालू ठेवण्यासाठी गती देण्याची क्षमता वडामध्ये असते, तर बोधीवृक्ष म्हणवला जाणारा तो पिंपळाचा वृक्ष असतो.

वडाचे वैशिष्ट्य

वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य असे की त्याला मोठमोठ्या पारंब्या फुटतात. फांदीपासून फुटलेली पारंबी जमिनीला टेकली की त्यातून वृक्षाचा विस्तार वाढत जातो. आयुर्वेदातही वंशवृद्धीसाठी वडाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. वडाच्या पारंब्या, साल, अंकुर, पाने, फळे वगैरे सर्वच भागांचे औषधी उपयोग असतात. गर्भाशयाची शुद्धी करायची असो, वीर्यशक्ती वाढवायची असो, गर्भविकासाला मदत करायची असो, दीर्घायुष्य हवे असो वडाच्या झाडाची आवश्यकता लागते. वटवृक्ष अनेक वर्षे जगतो म्हणून त्याला ‘अक्षयवट’ असेही म्हटले जाते. बत्ताशावर वडाच्या झाडाचा चीक घालून रोज सेवन करणे हे दीर्घायुष्यासाठी उपयुक्त असते. यामुळेच सावित्रीने वडाच्या झाडाखाली पूजा करून आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले ही कथा प्रचलित असावी.

प्राणशक्तीचे आवाहन

प्राणशक्तीचे आवाहन करण्यासाठी प्रदक्षिणा करायची असते. दक्षिण म्हणजे उजव्या हाताने समोरच्या दिशेने गोलाकार दिशेत केलेली प्रदक्षिणा शक्तीचा उत्कर्ष करणारी असते. म्हणून मंदिरादी प्रार्थनास्थळांना प्रदक्षिणा घालण्याची पद्धत असते. पौर्णिमेला चंद्रशक्ती, पर्यायाने वनस्पतींमधला सोमरस पूर्णत्वाला पोचलेला असतो आणि म्हणून वर्षातील एक, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा वटवृक्षाच्या सान्निध्यात येण्यासाठी समर्पित केलेली आहे. पूजेच्या निमित्ताने तास-दीड तास वटवृक्षाच्या छायेत बसता येणे, झाडाला सूत गुंडाळण्याच्या निमित्ताने झाडाला प्रदक्षिणा घालण्याने प्राणशक्तीचे उत्थापन, आज्ञाचक्रातील ग्रंथीला उत्तेजना मिळू शकणे, यामुळे शरीरातील अग्नितत्त्वाचे पर्यायाने हॉर्मोन्सचे संतुलन होण्यास मदत मिळणे या सगळ्या गोष्टी वटपौर्णिमेच्या निमित्ताने साधता येऊ शकतात.

मात्र, मूळ हेतू किंवा त्यामागचे विज्ञान लक्षात न घेता पूजा-अर्चा हे सर्व देवासाठी किंवा धर्मासाठी केलेले कर्मकांड आहे असे समजण्याने वडाची फांदी तोडून त्याची पूजा करणे किंवा वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करणे अशा हास्यास्पद रूढी प्रचलित झालेल्या दिसतात किंवा आधुनिकतेच्या नावाखाली या सर्व गोष्टींकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. यामुळे नुकसान आपलेच आहे. हर्बल, नैसर्गिक, वनस्पतिज या शब्दांना आज किती महत्त्व आहे हे आपण सर्वजण जाणतो. फक्त शब्द वापरण्याऐवजी वनस्पतींचे सूक्ष्म गुणधर्म जाणून त्यांना असलेले मन व भावना समजून घेऊन त्यांच्याशी संपर्क राखणे ही खरी आजची गरज आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने हे साधता आले तर अक्षय आरोग्याचा लाभ होईल हे नक्की.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com