उत्सव शक्तीचा...!

शक्तिउपासनेचा सर्वांत महत्त्वाचा आणि नऊ दिवसांसाठी चालणारा उत्सव म्हणजे ‘नवरात्र उत्सव’. शिव-शक्तीमधील शक्तीचा हा उत्सव.
Durga
DurgaSakal

प्राचीन भारतीय शास्त्रात शक्तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींना नामोहरम करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्र्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशाप्रकारे सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे आढळेल.

शक्तिउपासनेचा सर्वांत महत्त्वाचा आणि नऊ दिवसांसाठी चालणारा उत्सव म्हणजे ‘नवरात्र उत्सव’. शिव-शक्तीमधील शक्तीचा हा उत्सव. जीवनात पदोपदी शक्तीची आवश्यकता असते. लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी; तरुणांना धडाडीने कार्य करण्यासाठी; चाळिशीच्या सुमाराला हातात घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी व वार्धक्यात निदान स्वतःचे काम स्वतः करण्यासाठी शक्ती हवी असते. तेव्हा शक्ती हा सर्वांच्याच श्रद्धेचा व आवडीचा विषय असतो. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या शक्तीची अजूनही अनेक रूपे असतात. प्रत्येक देवतेच्या मागे असणारी ‘चिद्शक्ती’, मंत्रशक्तीच्या अगोदर असणारी ‘मातृकाशक्ती’, शंकर-महादेवांच्या पलीकडे असलेली ‘पराशक्ती’, सर्व मनुष्यमात्रांचे जीवन उजळून टाकणारी ‘कुंडलिनी शक्ती’, शिवाजी महाराजांना तलवार देणारी ‘भवानी शक्ती’; असा हा सर्व शक्तीची खेळ व पसारा आहे. साहजिकच वेगवेगळ्या मार्गांनी व वेगवेगळ्या वेळी या शक्तीची आठवण ठेवण्यासाठी शक्तिपूजनाचे सण अनेक असतात, मात्र नवरात्र उत्सवाला अधिक जोर येतो तो नंतर येणाऱ्या दिवाळीमुळे. शक्तिउपासनेतून तयार झालेला प्रकाश, मिळालेली तेजस्विता नंतर येणाऱ्या दीपावली उत्सवामध्ये आतून अनुभूत करायची असते. ‘भा’ म्हणजे तेज व ‘रत’ म्हणजे रममाण होणारा. म्हणजे शक्तीच्या व तेजाच्या उपासनेत रममाण होणारे ते ‘भारतीय’! पूजेतल्या मूर्तीला जगदंबा, अंबा असे म्हटले जाते आणि लक्ष्मी, सरस्वती, गायत्री वगैरे रूपांनी ती समजली जाते.

ही शक्ती आणि वैज्ञानिकांना अभिप्रेत असणारी शक्ती या वेगवेगळ्या नाहीत. विद्युतशक्तीचा जनक असलेल्या एडिसनने स्वतःच म्हटले होते की मी वीज शोधली असे म्हणतात, पण ते खरे नाही, मी फक्त वीज कशी वापरायची हे शोधले, तिला प्रकट कशी करायचा हे शोधले. वीज म्हणजे काय ते मला कळलेले नाही. असं म्हणतात की दोन चुंबकीय दगड डाव्या-उजव्या बाजूला ठेवून एका रिळावर तांब्याची तार गुंडाळून त्याला जर मध्यभागी फिरवले तर त्यातून उत्पन्न होणारी वीज कोठून येते? तांब्याच्या तारेत प्रकट होण्यापूर्वी ती कुठे असते? वीज बनवण्याचे प्रकार जरी अनेक असले तरी पाण्याच्या झोताखाली चक्र फिरवण्याची योजना किंवा कोळसे जाळून पाण्याच्या वाफेद्वारे चक्र फिरवण्याची योजना राबवली असता तांब्याच्या तारेत वीज कशी काय उत्पन्न होते, ती कुठून आली, कुठे जाते, कायम का राहत नाही, तिला साठवता का येत नाही अशा अनेक गोष्टींची उत्तरे आजतागायत निश्चित सांगता येत नाहीत.

हा विज्ञानातील चमत्कारच नाही का? वैज्ञानिकांनी वीज नाही तर विजेच्या आवाहनाचे तंत्र शोधून काढले. तसेच आध्यात्मिक मार्गाने चालणाऱ्या ऋषिमुनींनी नवरात्र उपासनेच्या रूपाने परमशक्तीला आवाहन करण्याचे तंत्र विकसित केले असे म्हणता येईल. आवाहनाची पद्धत निरनिराळी असली, शक्तीचे स्वरूप वेगवेगळे असले तरी ती कुठून आली हे मात्र अज्ञातच राहते. प्राचीन भारतीयशास्त्रात शक्तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्र्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे सापडेल.

आईवडिलांपासून किंवा पूर्वजन्माच्या इच्छा, आकांक्षांतून निर्माण झालेली कर्मबंधने जनुकांनी साठवलेली असतात आणि त्यामुळे मनुष्य बराचसा परस्वाधीन होतो. या बंधनातून सुटून स्वातंत्र्य व मुक्तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ज्या शक्तीची आवश्यकता असते व त्यासाठी जी उपाययोजना करायची त्यातून नवदुर्गा नवरात्रमहोत्सवाची आवश्यकता लक्षात येऊ शकेल. इंद्रिय, मन व आत्मा यांची प्रसन्नता हे आरोग्याचे लक्षण असते व शक्तिशिवाय आरोग्य नसते.

रडण्यापेक्षा हसण्यासाठी अधिक शक्तीची आवश्यकता असते, किंबहुना शक्ती नसली की रडू येते. शक्तीत ‘जाण-समज’ असली तर ती शक्ती वेगळ्याच पातळीवर जाऊन पोचते. शक्ती सर्वच अणुरेणूत असते. आध्यात्मिक क्षेत्रात शक्तीची पूजा साडेतीन मात्रांमध्ये होते. शक्तिपीठे आहेत सात. विज्ञानातील रचनाही साडेतीन स्वरूपात म्हणजे तीन फेज व न्यूट्रल अशीच केलेली असते. गर्भात शक्तीचे आवाहन होण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस हा कालावधी सांगितलेला असतो. साध्या शारीरिक व मानसिक शक्ती मिळवण्यासाठीसुद्धा विशेष कष्ट व विशेष प्रयत्न करावे लागतात. तेव्हा या जगज्जननी मातेच्या शक्तीची प्राप्ती सहज होईल अशी अपेक्षा करणे कसे शक्य आहे? म्हणून नवरात्रात मध्यभागी दीपज्योत ठेवून भोवती चक्राकार गतीने नाचत गरबा खेळत, रास रंगवत शक्तीचे आवाहन केले जाते. शारीरिक शुद्धी व्हावी या उद्देशाने उपवास करून जास्तीच जास्त वेळ शक्तीच्या आवाहनात घालवला जातो. या जगज्जननी, जगदंबामाता, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीची उपासना करण्याची प्रेरणा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाला मिळून शक्तिउपासनेसाठी सर्व प्रवृत्त होवोत, हीच प्रार्थना.

( श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com