दिवाळी पाडवा आणि बदलते स्वरूप

दिवाळी पाडवा आणि बदलते स्वरूप

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा साजरा केला जातो. अशी आख्यायिका आहे की, बळिराजा हा अत्यंत दानशूर होता. दान देणे हा चांगला गुण आहे; पण या गुणाचा अतिरेक हा दोषच आहे.
Published on

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा साजरा केला जातो. अशी आख्यायिका आहे की, बळिराजा हा अत्यंत दानशूर होता. दान देणे हा चांगला गुण आहे; पण या गुणाचा अतिरेक हा दोषच आहे. हा अतिरेक बळिराजाच्या हातून झालेला आहे याची इतिहास साक्ष देतो. व्यापारी वर्गासाठी हा दिवस म्हणजे नवीन हिशोबाच्या वह्यांचे पूजन करून व्यावहारिकदृष्ट्या नव्याने होणारी सुरवात. नवविवाहित दांपत्य हा सण पत्नीच्या माहेरी साजरा करतात. यास दिवाळ सण असे म्हणतात. जावयास यादिवशी आहेर करतात. पाडव्याच्या या मुहूर्तावर सुवासिनी आपल्या पतीचे औक्षण करतात. खास करून या दिवशी सुपारीने औक्षण केले जाते. पूर्वी यादिवशी अन्नकुट घालण्याची प्रथा होती. गावातील सारी माणसं एक-एक पदार्थ घेऊन येत. देवास नैवेद्य अर्पण करून सहभोजन करीत असत. यामधून एकात्मता व सामाजिकता वाढीस लागावी अशीच भावना होती.

काळाच्या ओघात सवड आणि आवडीनुसार सणावारांच्या व्याख्याही बदलताना दिसत आहेत. मात्र आज मोठ्या प्रमाणावर एकोपा जोपासणारा सण म्हणून दिवाळी-पाडव्याकडे पाहिले तर वावगं ठरणार नाही. कारण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेले कुटुंब आज एकत्र येऊन हा सण साजरा करतात. महिला वर्गास हक्काने माहेरी जाऊन विसावा मिळणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा. मित्र, मैत्रिणी, नातलग सर्वांना फराळास बोलावले जाते. यामुळे सर्वांच्या भेटीगाठी व विचारांची देवाणघेवाण होते.

याच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आजचा हौशी वर्ग भरगच्च शॅापिंग करतानाचे चित्र सर्वत्र आढळतो. मग कपडे, दागिने, फर्निचर विविध वस्तूंची यादी यामध्ये येते. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घेण्यापेक्षा देण्याला जास्त महत्त्व आहे हे जाणणारा वर्ग आज तुरळकच असावा. या दिवशी समोरासमोर भेटून पाडव्याच्या शुभेच्छा हसतमुखाने दिल्या जातात. पण यापेक्षा व्हॉट्सॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाद्वारे ऑनलाइन दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव व स्वीकार सध्या महत्त्वाच्या ठरताना दिसत आहे.

मागील दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाच सण हा चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला नव्हता. ही दिवाळी व हा पाडवा म्हणजे समाजमनात नवचैतन्य घेऊन येणारा ठरणार यात दुमत नाही. चला तर मग भयाच्या संकटास सावरून आनंद, आशावाद घेऊन येणाऱ्या दिवाळीच्या पाडव्याकडे सकारात्मकतेने पाहूया अन् सदैव हसत-खेळत जगूया.

- रेखा ढेरे-घोलप, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com